Alephata Burglary: सोसायटीत भरदिवसा धाडसी घरफोडी; कुलूप तोडून ९० हजारांचा ऐवज लंपास
Alephata Burglary: आळेफाटा परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ; सोसायटीमध्ये प्रभावी सुरक्षा व्यवस्था आणि गस्त घालण्याची नागरिकांची मागणी.
Updated On:

Alephata Burglary – आळेफाटा परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ‘शुभम तारांगण’ या सोसायटीत भरदिवसा घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे सोसायटीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोसायटीतील विशाखा बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक १०६ मध्ये राहणारे कैलास विजय पटाडे हे १७ मे रोजी कुटुंबासह मूळ गावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.
चोरट्याने कपाटातील कप्पे फोडून त्यातील ३० हजारांची रोख रक्कम, लहान मुलांच्या सोन्याच्या मनगट्या, सोन्याच्या कानातील बाळ्या तसेच चांदीचे दागिने असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरमालक परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले व चोरीचा प्रकार समोर आला.
या घटनेनंतर सोसायटीतील सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा रक्षकांची गस्त आणि प्रवेश नियंत्रण व्यवस्था यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे. तसेच या प्रकारामुळे आळेफाटा परिसरात पुन्हा एकदा घरफोडीच्या वाढत्या घटनांचा मुद्दा चर्चेत आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





