Baramati News: बारामतीत काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन! ‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी जोरदार घोषणाबाजी
Baramati News: 'वंदे मातरम्' हे भारताच्या अस्मितेचे प्रतीक; राष्ट्रीय गीताचा अवमान सहन करणार नसल्याचा भाजयुमो जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांचा इशारा.

Baramati News – काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा कथित अपमान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने बारामतीतील गुणवडी चौक येथील काँग्रेस कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कथित अवमानाचा निषेध नोंदवला.
यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर म्हणाले, “‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नाही, तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा, देशाच्या अस्मितेचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांच्या राष्ट्रभावनेशी जोडलेली भावना आहे. त्यामुळे या राष्ट्रीय गीताचा कोणत्याही प्रकारे कथित अवमान आम्ही सहन करणार नाही. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र राष्ट्रभावना आणि देशाच्या गौरवाशी तडजोड होता कामा नये.
‘वंदे मातरम्’चा सन्मान राखण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा सदैव ठामपणे उभा राहील.” आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. राष्ट्रीय गीताबद्दल आदर व्यक्त करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आपला निषेध नोंदवला. आंदोलनाच्या शेवटी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन केले. ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
सामूहिक गायनातून राष्ट्रीय गीताबद्दलचा आदर आणि राष्ट्रभक्तीची भावना व्यक्त करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून घटनास्थळी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.





