Bribe: मालमत्ता परताव्याच्या अर्जावर अनुकूल म्हणणे दाखल करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वसई येथील सरकारी वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई वसई न्यायालयाच्या आवारात करण्यात आली. भूपेश अजित पुरंदरे (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या सरकारी वकिलाचे नाव आहे. ते वसई येथील संयुक्त दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) येथे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत आहेत. ते वर्ग-दोन दर्जाचे अधिकारी असल्याची माहिती एसीबीने दिली. ठाणे एसीबीकडे २० मे रोजी याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर एसीबीने पडताळणी केली असता, मालमत्ता परताव्याशी संबंधित अर्जावर अनुकूल म्हणणे दाखल करण्यासाठी पुरंदरे यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर एसीबीने गुरुवारी सापळा रचला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वसई न्यायालय इमारतीच्या तळमजल्यावरील सरकारी अभियोक्त्यांच्या कार्यालयात तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पुरंदरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी पुरंदरे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.