प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती शहरात रविवार (दि. २८) रोजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चे उद्घाटन सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. या सोहळ्यात अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी, ज्येष्ठ नेते शरद पवार हे एकाच व्यासपीठावर येत आहे. विशेष म्हणजे संपूर्ण पवार कुटुंबीय सहभागी होणार असल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्षभरात शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे शरद पवार यांचा पक्ष मूळ राष्ट्रवादीत विलीन होणार काय, या चर्चेला उधाण आले होते. दोन महिन्यांत अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत दोनवेळा भेट घेतली आहे. (दि.१२) डिसेंबरच्या पूर्वसंध्येला शरद पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी मेजवानीचे आयोजन केले होते. त्यावेळी देशातील नेत्यांना आमंत्रण दिले होते. त्यावेळी उद्योगपती अदानी हे सहभागी होते. अजित पवार यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे शरद पवार यांचा पक्ष सत्तेशी सोयरीक करणार काय, यावर खलबते सुरू होती.गेल्या आठवड्यात दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी पुन्हा उपमुख्यमंत्री पवार यांनी भेट घेतली होती. त्यावेळी अदानी हे हजर होते. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. दोन महिन्यांतील राजकीय घडामोडीवरून महाराष्ट्राच्या राजकारणाचे कूस बदलणार काय, याचे संकेत मिळत आहेत. महापालिका निवडणुकीत पुण्यात मनोमिलनाच्या दिशेने वाटचालीला बळ मिळाले आहे. अदानी- पवार कोणते सूचक संकेत देणार? बारामती येथे आयोजित कार्यक्रमात अदानी आणि शरद पवार, उपमुख्यमंत्री पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार यांच्यासह पवार कुटुंबीय हे एकत्र येत असल्याने तर्क- वितर्क लढविले जात आहेत. महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन होणार काय, यावर खल सुरू आहे. या कार्यक्रमातून अदानी आणि शरद पवार हे भाषणातून कोणते सूचक वक्तव्य करणार, याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रात सुळेंना मंत्रिपदाची ऑफर? शिवसेनेतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याप्रमाणे शरद पवार यांचा पक्ष हा अचानक निर्णय घेत केंद्रातील मोदी सरकारमध्ये सहभागी होणार काय, यावर चर्चा झडत आहेत. केंद्रात खासदार सुप्रिया सुळे यांना मंत्रीपद तर राज्यात माजी मंत्री जयंत पाटील यांना संधी, अशी शक्यता वर्तविली जात आहे.