Baramati News : बारामतीत लाचखोर वनपाल ‘एसीबी’च्या जाळ्यात; शेतजमिनीवरील कामासाठी लाच घेताना रंगेहाथ पकडले
शेतजमिनीवरील काम सुरू ठेवण्यासाठी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बारामतीतील (Baramati News) वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

Baramati News : शेतजमिनीवरील काम सुरू ठेवण्यासाठी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बारामतीतील (Baramati News) वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. जाहीर सिराज शेख (वय ४७, पद वनपाल, वर्ग-३, करंजे रेंज ऑफिस, बारामती) असे कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) बारामतीतील हॉटेल शिवकृपा परिसरात ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ६० वर्षांचे असून, त्यांची कोळ्हाळे खुर्द परिसरात (Baramati News) चार हेक्टर शेतजमीन आहे. या जमिनीवरील माती वाहून नेण्याचे काम सुरू असताना वनपाल जाहीर शेख यांनी २६ सप्टेंबर २०२६ रोजी काम बंद करण्यास सांगितले होते. त्यानंतर संबंधित कामावर कारवाई न करता ते सुरू ठेवण्यासाठी शेख यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
यापैकी चार हजार रुपये यापूर्वी दिले असून, उर्वरित सहा हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर विभागाने पडताळणी केली. त्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान सहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून वनपालाला पकडण्यात आले.
या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Baramati News) मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.






