Baramati : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवे वळण
Baramati : हल्ल्याच्या दिवशी या तिघांच्या वापरातील डिफेंडर गाडीचा सूर्यवंशी यांच्याशी संबंध आढळल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर याच गाडीतून त्यांना बारामतीतील रुग्णालयात नेण्यात आले.

बारामती : राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात तपासाला नवे वळण मिळाले आहे. हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात सूर्यवंशी यांचे जवळचे मित्र असल्याची माहिती पुढे आल्याने त्यांच्या भूमिकेची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचा संशय, हल्ल्याच्या दिवशी वापरण्यात आलेली डिफेंडर गाडी आणि घटनेनंतर सूर्यवंशी यांना रुग्णालयात दाखल करण्यापासून पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपस्थित राहण्यापर्यंतच्या घटनांचा तपासात समावेश आहे.
विशाल धुमाळ, सागर पवार आणि रोहित तुपे अशी तपासात समोर आलेल्या संशयितांची नावे असल्याची माहिती आहे. या तिघांनी दौंड परिसरातील एका ढाब्यावर स्वप्निल कांबळे आणि निनाद महाडिक यांची भेट घेऊन दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, कथित सुपारीमागील नेमके कारण आणि संबंधित व्यक्तींचा कटातील सहभाग याबाबत अद्याप तपास सुरू आहे.
हल्ल्याच्या दिवशी या तिघांच्या वापरातील डिफेंडर गाडीचा सूर्यवंशी यांच्याशी संबंध आढळल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर याच गाडीतून त्यांना बारामतीतील रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातही संबंधित तिघे उपस्थित असल्याचे सांगितले जाते. हल्ल्यापूर्वी झालेल्या कथित भेटीपासून ते हल्ल्यानंतरच्या हालचालींपर्यंतच्या घटनांची सांगड घालून पोलीस तपास करत आहेत.
चालकाच्या अटकेनंतर तपासाला दिशा
या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामध्ये सूर्यवंशी यांचा चालक ज्ञानेश्वर शिंदे याचाही समावेश आहे. शिंदे याने स्वप्निल कांबळे याला सुपारी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर कांबळे याने पार्थ अवथळे आणि एका १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाकडे हल्ल्याची जबाबदारी सोपवल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. निनाद महाडिक याने हल्ल्यासाठी दुचाकी उपलब्ध करून दिल्याचा संशय आहे.
१९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी बारामती विमानतळाजवळ सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाला होता. तपासातील माहितीनुसार, आपण त्यांचे चाहते असल्याचे सांगत हल्लेखोर त्यांच्याजवळ गेले. त्यानंतर गोळीबाराचा प्रयत्न करून धारदार सत्तूराने त्यांच्या हातावर वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली.
वाय दर्जाची सुरक्षा असतानाही हल्ला कसा झाला?
सूर्यवंशी यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. मात्र, हल्ल्याच्या दिवशी त्यांनी घटनास्थळापासून सुमारे दहा किलोमीटर आधी सुरक्षारक्षकांना थांबविल्याची माहिती समोर आली आहे. जमिनीची पाहणी आणि व्यवहारासंदर्भातील चर्चेसाठी थांबायचे असल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती आहे.
दरम्यान, त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस जवानाच्या हाताला चावा घेऊन हल्लेखोर पळून गेल्याचा उल्लेख फिर्यादीत असल्याचे सांगितले जाते. सुरक्षा व्यवस्था असतानाही हल्लेखोरांना सूर्यवंशी यांच्यापर्यंत पोहोचता आले कसे, सुरक्षारक्षकांना आधी थांबविण्याचा निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला गेला आणि या घटनांचा हल्ल्याच्या नियोजनाशी काही संबंध आहे का, याचीही चौकशी महत्त्वाची ठरणार आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, कथित आर्थिक व्यवहाराचा संबंध, संशयितांमधील संपर्क आणि प्रत्येकाची भूमिका याबाबतचे चित्र पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
दोन लाखांच्या कथित सुपारीचा तपास
विशाल धुमाळ, सागर पवार आणि रोहित तुपे यांच्या भूमिकेची पडताळणी.
दौंड परिसरातील ढाब्यावर झालेल्या कथित भेटीचा तपास.
सुपारीमागील कारण आणि आर्थिक व्यवहाराचा शोध.
डिफेंडर गाडी आणि रुग्णालयातील उपस्थिती
हल्ल्यानंतर सूर्यवंशी यांना बारामतीतील रुग्णालयात नेण्यासाठी गाडीचा वापर.
पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातील संशयितांच्या उपस्थितीची पडताळणी.
हल्ल्यापूर्वीच्या संपर्कांची आणि घटनाक्रमानुसार हालचालींची चौकशी.





