Baramati Lok Sabha Candidate । बारामती लोकसभा निवडणुकांसाठी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा होत आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर लोकसभा निवडणुकांचे निकाल काय लागणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत फारकत घेतल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काय होणार याबाबत चर्चांना उधाण आलं होत. अशातच, बारामती येथून आपल्याच विचाराचा उमेदवार निवडून द्या असे आवाहन करत स्वतः अजित पवार यांनी बारामती लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.
सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी प्रचाराला सुरुवातही केली आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय लढताना दिसणार आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांना थेट आव्हानच दिले. बारामतीत माझ्यासारखा तगडा उमेदवार द्या, मग ते म्हणतील ती जागा, ते म्हणतील ते ठिकाण आणि ते म्हणतील ती वेळ. मी चर्चेस तयार आहे, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिले.