Sunetra Ajit Pawar – बारामती परिसरामध्ये, अजित पवार व सुनेत्रा पवार यांचा फोटो असलेले व सुनेत्रा पवार यांच्या कामांचा लेखाजोखा मांडणारे हे प्रचार वाहन फिरत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात, पवारांची लेक विरुद्ध पवारांची सून हा राजकीय सामना पाहायला मिळणार या चर्चेने जोर धरलाय. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना या चर्चाना हवा देणाऱ्या ठरतायेत.
बारामती लोकसभा निवडणुकांसाठी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात ज्यांच्या नावाची चर्चा होत आहे त्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत? त्यांचं कार्य काय आहे? याबाबत माहिती देणारा हा व्हिडीओ…
पाटलांची लेक, पवारांची सून, कोण आहेत सुनेत्रा पवार? | Sunetra Ajit Pawar
सुनेत्रा पवार यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील पाटील घराण्यात झाला. माजी राज्यमंत्री आणि लोकसभेचे खासदार पदमसिंह पाटील हे त्यांचे बंधू आहेत. शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पदमसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.
पदमसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील सध्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे भाजप आमदार आहेत. २०१९ विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
सुनेत्रा अजित पवार – कार्यकर्त्यांच्या वाहिनी | Sunetra Ajit Pawar
– अजित पवार यांना त्यांचे समर्थक दादा नावाने संबोधतात तर सुनेत्रा पवार यांना वाहिनी म्हणून. त्यांनी अद्याप कोणतीही निवडणूक लढवलेली नसली तरी त्यांचा समाजकारण तसेच राजकारणातही वावर आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये पती अजित पवार यांच्या प्रचाराची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी सांभाळली आहे.
– सुनेत्रा पवार या 2008 पासून ग्रामीण विकासासाठी काम करत आहेत. त्यांनी 2010 मध्ये एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया नावाच्या एनजीओची स्थापना केली आहे.
– सुनेत्रा पवार यांनी, २००६ पासून केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क लिमिटेड या मल्टीमॉडल गारमेंट उत्पादक पार्कच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे.
– 2011 पासून त्या फ्रान्स-आधारित जागतिक उद्योजकता मंचाच्या सदस्य आहेत.
– विद्या प्रतिष्ठान ट्रस्टच्या देखील त्या सदस्य आहेत.
सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांची लोकसभा उमेदवारी
२०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये मुलगा पार्थ पवार याला उमेदवारी देण्यात यावी यासाठी सुनेत्रा पवार यांनी आग्रही भूमिका घेतली होती, असं सांगितलं जातं. यानंतर पार्थ पवार यांना मावळ येथून उमेदवारी देण्यात आली होती.
शरद पवार यांनी कुटुंबातील दोनहून अधिक सदस्यांना उमेदवारी नको असे कारण देत निवडणुकीतून माघार घेतली होती.
पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून शरद पवार व अजित पवार यांच्याच तेव्हा खटके उडाल्याचेही बोलले जाते. पार्थ पवार यांचा मावळ येथून २ लाख हून अधिक मतांनी पराभव झाला होता.
पहाटेच्या शपथविधीमध्ये देखील रोल? | Sunetra Ajit Pawar
नोव्हेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात ‘पहाटेचा शपथविधी’ म्हणून ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या शपथविधीमध्ये सुनेत्रा पवार यांचा देखील रोल होता, असं पक्षातील नेते सांगतात. अर्थात याबाबत कोणी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
अजित पवार यांनी रणशिंग फुंकले | Sunetra Ajit Pawar
महाराष्ट्रामध्ये शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर लोकसभा निवडणुकांचे निकाल काय लागणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत फारकत घेतल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काय होणार याबाबत चर्चांना उधाण आलं होत.
अशातच, बारामती येथून आपल्याच विचाराचा उमेदवार निवडून द्या असे आवाहन करत स्वतः अजित पवार यांनी बारामती लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.