Baramati Crime: बारामतीत पोलिसांचा धडाका! गंभीर गुन्ह्यांमध्ये ६.५ टक्क्यांची घट; खुनाचे प्रमाण थेट ‘शून्यावर’
Baramati Crime: जुलै २०२५ च्या तुलनेत जुलै २०२६ अखेर बारामती विभागात गंभीर गुन्ह्यांमध्ये ६.५ टक्क्यांची घट; पोलिसांच्या प्रभावी कारवाईचे चित्र स्पष्ट.

– प्रमोद ठोंबरे
Baramati Crime – बारामती विभागातील कायदा व सुव्यवस्थेवर पोलिसांनी अधिक प्रभावी पकड निर्माण केल्याचे चित्र समोर आले आहे. बारामती शहर, बारामती तालुका आणि माळेगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील दहा निवडक गंभीर गुन्ह्यांच्या तुलनात्मक आकडेवारीनुसार, जुलै २०२५ अखेरच्या तुलनेत जुलै २०२६ अखेर गुन्ह्यांमध्ये सुमारे ६.५ टक्क्यांची घट झाली आहे. विशेष म्हणजे खुनाचे गुन्हे दोनवरून थेट शून्यावर आले आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची माहिती. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, दहा निवडक गुन्ह्यांची संख्या २०२५ मध्ये १७० होती. यंदा ती १५९ वर आली आहे. म्हणजेच ११ गुन्ह्यांची घट झाली आहे. खून आणि खुनाचा प्रयत्न हे दोन्ही गंभीर गुन्हे एकत्रितपणे १३ वरून १० वर आले असून सुमारे २३ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.
जबरी चोरी, चैन स्नॅचिंगमध्येही घट
जबरी चोरीचे गुन्हे १४ वरून आठ, चैन स्नॅचिंगचे गुन्हे १० वरून सात, बलात्काराचे गुन्हे १६ वरून १३, तर दुखापतीचे गुन्हे ९१ वरून ८६ झाले आहेत. जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सुमारे ४३ टक्के, चैन स्नॅचिंगमध्ये ३० टक्के आणि बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये सुमारे १९ टक्के घट झाली आहे. सदोष मनुष्यवध आणि दरोडा तयारी या दोन्ही प्रकारांत दोन्ही वर्षांच्या तुलनात्मक कालावधीत एकही गुन्हा दाखल झालेला नाही.
मात्र, दरोड्याचे गुन्हे दोनवरून चार, तर गर्दीमारामारीचे गुन्हे २४ वरून ३१ झाले आहेत. वाढलेल्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांचे स्वतंत्र विश्लेषण करण्यात येत असून संबंधित आरोपी, गुन्हेगारी गट आणि उपद्रवी व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
शहर व माळेगावमध्ये मोठी घट
बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहा निवडक गुन्ह्यांची संख्या ६२ वरून ५२ झाली आहे. त्यामुळे येथे सुमारे १६ टक्के घट झाली आहे. माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हीच संख्या ३८ वरून ३० झाली असून सुमारे २१ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत मात्र एकूण संख्या ७० वरून ७७ झाली आहे. गर्दीमारामारीच्या गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ ही त्यामागील प्रमुख कारण असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






