Baramati Crime : कोयता गँग’चा थरार! कार अडवून विद्यार्थ्यावर वार, अन् मग सुरू झाला पोलिसांचा ‘फिल्मी’ पाठलाग..पाहा काय घडलं?
Baramati Crime : जैनकवाडी फाट्यावर प्रवाशांना लुटून पळणाऱ्या टोळीचा सुपा रोडवर थरारक पाठलाग; दोन आरोपींना जाळ्यात ओढले, तिघे अंधाराचा फायदा घेऊन पळाले.

Baramati Crime – भिगवण-बारामती रोडवरील जैनकवाडी फाटा (ता.बारामती) येथे रात्रीच्या वेळी कोयता व लोखंडी दांडक्याचा धाक दाखवत कार अडवून प्रवाशांवर प्राणघातक हल्ला करून जबरदस्तीने चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात ६ ते ७ अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत विश्वराजे उर्फ विश्वा चंद्रशेखर पाटील (वय १८) यांनी फिर्याद दिली आहे.
ते सध्या शिक्षणासाठी शारदानगर (ता. बारामती) येथील कॉमन होस्टेलमध्ये वास्तव्यास असून मूळ रहिवासी उमरड (ता.करमाळा, जि.सोलापूर) आहेत. फिर्यादी व त्यांचे सहकारी मारुती सुझुकी कंपनीच्या कॅरी गाडीतून प्रवास करत असताना दि.७ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जैनकवाडी फाट्याजवळ ६ ते ७ अनोळखी इसमांनी अचानक रस्त्यात आडवे जात गाडी अडवली. हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडून कोयता व लोखंडी दांडक्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली.
यावेळी फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्याला जखमी करण्यात आले व जबरदस्तीने चोरी करण्यात आली. या हल्ल्यात फिर्यादीची स्कायबॅग कंपनीची जांभळ्या रंगाची बॅग, सोबतच्या मुलाची काळ्या रंगाची बॅग, गाडीच्या चालकाचा मोटोरोला कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल फोन, रेडमी कंपनीची चार्जिंग पॉवर बँक, एटीएम कार्ड, विविध कागदपत्रे व रोख रक्कम असा एकूण १२ हजार २० रुपयांचा मुद्देमाल हल्लेखोरांनी लुटून नेला.
टोळी धुडगूस घालत असल्याची माहिती होमगार्ड जवान सूर्यवंशी यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दिल्यानंतर, यादव यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी एका व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली असून टोळीतील आरोपींनी मोबाईल, रोख रक्कम व इतर साहित्य लुटून नेल्याचे स्पष्ट झाले. पोलीस निरीक्षक यादव यांनी आरोपींचे वर्णन, वापरलेली वाहने याच्या आधारे तातडीने शोधमोहीम सुरू केली.
मोटारसायकल व रिक्षाच्या मदतीने पळणाऱ्या आरोपींचा केडगाव चौफुला-सुपा रोडवर थरारक पाठलाग करण्यात आला. या दरम्यान दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले, तर उर्वरित आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, पोलिसांनी हार न मानता पुन्हा सखोल शोधमोहीम राबवत पळालेल्या तिघांपैकी दोघांना ताब्यात घेण्यात यश मिळवले. एक आरोपी मात्र फरार असून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
या आरोपींनी कुरकुंभ येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील सेल्समन म्हणून काम करणारे रवींद्र महेश खडके (वय 26, धंदा, मूळ रा. बार्शी, जिल्हा सोलापूर हल्ली रा. गोपाळवाडी ता. दौंड) यांच्यावर सुद्धा कोयत्याने वार केला.अटकेतील आरोपींकडून तीन धारदार कोयते, एक मोठा बेसबॉल रॉड तसेच चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धाडसी कारवाईत कृष्णा मोरे (रा. मार्केट यार्ड, पुणे), रुपेश आडवाल (रा. रासकर पार्क, कात्रज), संकेत शिलते (रा.पर्वती दर्शन, पुणे), ईश्वर मिसाळ (रा.खोपडे नगर, कात्रज) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.





