Baramati Crime: बारामतीत गोवंशाच्या अवैध वाहतुकीचा पर्दाफाश! तिघांवर गुन्हा दाखल

प्रभात वृत्तसेवा
बारामती – बारामती शहर पोलीस ठाण्यात गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तलीसाठी नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघाजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बजरंग दलाच्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २९) गुणवडी रोड येथे पोलिसांनी एका पिकअपमधून (एमएच १२-वायबी ४०८०) कत्तलीच्या उद्देशाने नेल्या जात असलेल्या चार सुदृढ दुभत्या गायींना ताब्यात घेतले.
वाहन चालक सलमान ईमानदार (रा. कोळविरे, ता. पुरंदर) आणि क्लिनर चंद्रकांत बरडे (रा. जेजुरी) यांना या गायी दलाल दत्ता पवार यांनी ७,००० रुपये भाड्यावर सांगोला (जि. सोलापूर) येथे कत्तलीसाठी पोहोचविण्यासाठी पाठविल्याची कबुली दिली. वाहनात गायी अत्यंत अमानुष व क्रूर पद्धतीने कोंबून ठेवलेल्या होत्या, तसेच त्यांच्याकडे वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. पोलिसांनी गायींना तात्काळ चारा-पाणी देऊन सासवड येथील हंबीरराव मोहिते गोशाळेत पाठवले आहे.
याप्रकरणी चालक, क्लिनर, दलाल दत्ता पवार आणि गायी विकणारे शेतकरी यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी गोवंशाची अवैध कत्तल संघटित पद्धतीने करणाऱ्यांविरुद्ध बीएनएस कायदा कलम १११ नुसार ‘संघटित गुन्हा’ नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. बारामती शहर पोलीस निरीक्षक श्रीशैल शेट्टी यांनी गोवंश तस्करीविरुद्धची मोहीम प्रभावी करण्यासाठी नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.





