Baramati Crime: भरधाव कार, टपावर बसलेला तरुण अन्…; बारामतीत ‘हॉलीवूड स्टाइल’ स्टंटबाजी, पोलिसांनी शिकवला धडा
Baramati Crime:: इंदापूर चौक परिसरात वर्दळीच्या रस्त्यावर भरधाव कारने स्टंटबाजी; बारामती शहर पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, वाहन जप्त.

Baramati Crime: – इंदापूर चौक परिसरात भरधाव चारचाकी वाहनातून धोकादायक स्टंटबाजी करीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन जप्त केले आहे. दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजता वाहन क्रमांक एमएच ४२ बीएन १०९५ हे वर्दळीच्या रस्त्यावर अत्यंत वेगाने व निष्काळजीपणे चालवून इतर वाहनांना कट मारणे व धोकादायकरीत्या ओव्हरटेक करण्याचा प्रकार घडला.
वाहनाच्या टपावर बसलेला एक व्यक्ती व खिडकीतून शरीर बाहेर काढून हातवारे करणाऱ्या दुसऱ्या इसमामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. याप्रकरणी योगेश बापू लोंढे, किशोर संजय ढोरे उर्फ मोठा डावर व एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी किशोर ढोरेच्या पूर्व गुन्हेगारी रेकॉर्डची तसेच त्याच्यावरील प्रतिबंधक कारवाईची छाननी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलिसांनी केली.
स्टंटबाजांना पोलिसांचा इशारा
“सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करून नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी निर्भय राहावे,” असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.





