Reel Stunt : रील्सच्या नादात महामार्ग अडवला; फॉर्च्युनरमधून स्टंटबाजी पडली महागात!
Reel Stunt : मुंबई-बंगळुरू महामार्गावर नव्या गाड्यांचे चित्रीकरण; बावधन पोलिसांची धडक कारवाई

पिंपरी – सोशल मीडियावर रील्स टाकण्याच्या नादात थेट महामार्गावरच वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या दोघांना बावधन पोलिसांनी चांगलाच दणका दिला.
मुंबई-बंगळुरू महामार्गावर दोन फॉर्च्युनर गाड्या अत्यंत संथगतीने चालवत इतर वाहनांचा मार्ग अडवून चित्रीकरण करणाऱ्या चालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. दोन्ही चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चित्रीकरणासाठी वापरलेल्या दोन फॉर्च्युनर गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
सोमनाथ अशोक केदारी (रा. कुसगाव, मावळ) आणि अजय संभाजी यादव अशी कारवाई करण्यात आलेल्या चालकांची नावे आहेत. त्यांनी मुंबई-बंगळुरू महामार्गावर इतर वाहनांना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने आपल्या नव्या गाड्यांचे व्हिडिओ आणि रील्स शूट करण्यास सुरुवात केली.
महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तसेच या प्रकारामुळे अन्य वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला.
या प्रकाराची माहिती मिळताच बावधन पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही चालकांना ताब्यात घेत कारवाई केली. या वेळी फॉर्च्युनर (एमएच १४ केएच ५६४४) आणि फॉर्च्युनर (एमएच १४ एलयू १०८०) या दोन गाड्या जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर आयुक्त सारंग आवाड, अपर आयुक्त बसवराज तेली, उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक आयुक्त कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार, उपनिरीक्षक ठाकरे तसेच तपास पथकातील अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.
महामार्ग स्टंटबाजांसाठी इशारा
महामार्ग हा रील्स बनविण्याचा किंवा स्टंट करण्याचा परिसर नाही. काही सेकंदांच्या व्हिडिओसाठी स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Satara: पवित्र पोर्टलमधून जिल्ह्यात 357 जण होणार शिक्षक





