Baramati Bypoll – बारामती विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम (EVM) व व्हीव्हीपॅट (VVPAT) यंत्रांची द्वितीय यादृच्छिकीकरण (रँडमायझेशन) प्रक्रिया गुरूवारी (दि. १६) पूर्ण झाली. बारामती येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात ही प्रक्रिया पार पडली असून, याद्वारे आता मतदान केंद्रनिहाय यंत्रांचे वाटप निश्चित झाले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम व्यवस्थापन प्रणाली (ईएमएस) च्या माध्यमातून मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यांचे यादृच्छिक वाटप करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत द्वितीय यादृच्छिकीकरण करण्यात येते. ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या द्वितीय यादृच्छिकीकरणाबाबत सविस्तर सूचना ‘इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र मार्गदर्शिका’मध्ये उपलब्ध असून ती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर (https://www.eci.gov.in/evm-vvpat) पाहता येईल. ईएमएसच्या माध्यमातून २०१ बारामती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या साठवण व सुरक्षा नियमांनुसार, निवडणूक लढवणारे उमेदवार तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच अपक्ष उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी म्हणून योगेश मोहनदास, डॉ. विजयकुमार भिसे, सुखदेव हिवरकर, सुजित जाधव, रवी धुमाळ, संग्रामसिंह मोकाशी तसेच निवडणूक निरीक्षक विद्यानंद सिंग उपस्थित होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रनिहाय वाटप करण्यात आलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची यादी तसेच राखीव ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची माहिती सर्व उमेदवारांना देण्यात आली आहे. ही यंत्रे मतदानाच्या दिवशी संबंधित मतदान केंद्रांवर वापरण्यात येणार आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.