Bapu Pathare : “कामं करा नाहीतर कारवाईला सामोरे जा!” बापू पठारेंनी स्मशानभूमीतच अधिकाऱ्यांना झापलं; काय आहे नेमकं प्रकरण?
Bapu Pathare : स्मशानभूमीतील मातीचे ढिगारे आणि खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; आमदार बापू पठारे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना सुनावले.

Bapu Pathare – लोहगाव परिसरातील अर्धवट विकासकामांची पाहणी करत आमदार बापू पठारे यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकार्यांना कामे तात्काळ पूर्ण करण्याचा सक्त इशारा दिला. स्मशानभूमी परिसरात पडून असलेले माती व दगडांचे ढिगारे तसेच रस्त्यांची दुरवस्था त्वरित दूर करण्यात यावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.
आमदार बापू पठारे यांनी महापालिकेच्या अधिकार्यांसह ग्रामस्थांना सोबत घेत लोहगाव येथील स्मशानभूमी, मुख्य रस्ते तसेच रस्त्यांच्या कडेला साचलेले मातीचे ढिगारे आणि खड्ड्यांची पाहणी केली. अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.या पाहणी दौर्यात नगरसेवक रामभाऊ दाभाडे, अनिल सातव, श्रेयस खांदवे पाटील, ऐश्वर्या पठारे, माजी सभापती अशोक खांदवे, प्रीतम खांदवे पाटील, आदित्य खांदवे, दीपक खांदवे, रामभाऊ खांदवे,
तेजस निंबाळकर, आमदार बापू पठारे यांचे स्वीय सहाय्यक नवनाथ खांदवे, दीपक प्रभू खांदवे, नवनाथ निंबाळकर, विक्रम निंबाळकर, दिनेश निंबाळकर तसेच महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी पठारे यांनी अधिकार्यांना स्पष्ट सूचना देत अर्धवट राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्यास सांगितले.
काही ठिकाणी ठेकेदारांनी कामे अपूर्ण असतानाही बिलांची उचल केल्याची बाबही समोर आली. अशा ठेकेदारांवर तसेच कामात हलगर्जीपणा करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करण्याबाबत अधिकार्यांशी त्यांनी चर्चा केली. स्मशानभूमीत साचलेला कचरा, रस्त्यांच्या कडेला पडलेले कचर्याचे ढिग आणि खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती न केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अर्धवट कामांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी सर्व नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकत्रितपणे करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.विकासकामांमध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. संबंधित अधिकार्यांनी तातडीने कामे मार्गी लावावीत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे मागणी केली जाईल, असा इशाराही आमदार बापू पठारे यांनी यावेळी दिला.





