Bangladesh Cricket : मोठी बातमी! बांगलादेशने अखेर मिळवलं वर्ल्ड कपचं तिकीट; ‘या’ संघानेही मारली एन्ट्री
Bangladesh Cricket : बांगलादेश महिला संघाने २०२६ च्या महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी आपली जागा निश्चित केली आहे.

Bangladesh Cricket Team qualify for Women’s T20 World Cup 2026 : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि आयसीसी यांच्यातील वाद क्रीडा विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. पुरुषांच्या टी-२० वर्ल्ड कपमधून बांगलादेशची हकालपट्टी झाल्याच्या धक्क्यातून चाहते सावरत असतानाच, बांगलादेशच्या महिला संघाने मात्र आनंदाची बातमी दिली आहे. बांगलादेश महिला संघाने २०२६ च्या महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी आपली जागा निश्चित केली आहे.
महिला संघ विश्वचषकासाठी पात्र –
बांगलादेशने ‘सुपर-६’ फेरीच्या सामन्यात थायलंडचा ३९ धावांनी पराभव करत वर्ल्ड कपचे तिकीट मिळवले. यंदाचा महिला टी-२० वर्ल्ड कप इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवला जाणार आहे. पुरुषांच्या वर्ल्ड कपवर बहिष्काराचा निर्णय घेतल्यामुळे नाराज असलेल्या बांगलादेशी चाहत्यांसाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी ठरली आहे.
Bangladesh book their berth for the ICC Women’s T20 World Cup 2026 in June 👏#T20WorldCup pic.twitter.com/2EjnsJQoZ0
— T20 World Cup (@T20WorldCup) January 28, 2026
नेदरलँड्सचा नवा इतिहास –
बांगलादेशसोबतच नेदरलँड्सच्या महिला संघानेही या स्पर्धेसाठी पात्रता (Qualify) सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, नेदरलँड्सचा महिला संघ पहिल्यांदाच टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे डच क्रिकेटमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पुरुषांच्या वर्ल्ड कपमधून बाहेर का झाले?
बांगलादेश महिला टी२० विश्वचषक २०२६ साठी पात्र
२०२६ च्या सुरुवातीला केकेआरने (KKR) मुस्तफिझूर रहमानला बीसीसीआयच्या सूचनेवरून संघातून मुक्त केले होते. या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड प्रचंड संतापले आणि त्यांनी ७ फेब्रुवारीपासून भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी आपला संघ पाठवण्यास नकार दिला. आयसीसीने समजावूनही बांगलादेश आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे.
महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे स्वरूप –
- आयोजक: इंग्लंड आणि वेल्स
- कालावधी: १२ जून ते ५ जुलै २०२६
- एकूण संघ: १२ (पैकी १० संघांची नावे निश्चित झाली आहेत)
- पात्रता: ८ संघ रँकिंगच्या आधारे निवडले गेले आहेत, तर ४ संघ पात्रता फेरीतून येणार आहेत. (बांगलादेश आणि नेदरलँड्स पात्र ठरले असून आता केवळ २ जागा शिल्लक आहेत).





