BCB : बांगलादेशातील सत्तापालटानंतर क्रिकेट बोर्डाला मिळाला नवा प्रमुख, जाणून घ्या…कोणाला मिळाली जबाबदारी

Bangladesh Cricket Board New President : बांगलादेशातील सत्तापालटानंतर तेथील परिस्थितीमुळे महिला टी-20 विश्वचषक 2024 चे सामने युएई (UAE) मध्ये हलवण्यात आले. त्यातच, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष नजमुल हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता मंडळाला नवा अध्यक्ष मिळाला आहे. ढाका येथे बुधवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत माजी क्रिकेटपटू फारुख अहमद यांची नूतन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
फारुख अहमद बांगलादेश क्रिकेट बोर्डात पद भूषवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ते दोनदा संघाचे मुख्य निवडकर्ताही होते. प्रथम 2003 ते 2007 आणि नंतर 2013 ते 2016 पर्यंत फारुख अहमद यांनी मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सांभाळली. तथापि, फारुख अहमद यांनी मुख्य निवडकर्ता म्हणून दुसऱ्या कार्यकाळात मध्यंतरी राजीनामा दिला होता कारण निवड समितीचा विस्तार त्यांना मान्य नव्हता. दरम्यान मुख्य निवडकर्ता असताना त्याच्या पहिल्या कार्यकाळात शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम आणि तमिम इक्बाल या खेळाडूंनी बांगलादेशकडून पदार्पण केले होते.
Newly elected Bangladesh Cricket Board President, Mr. Faruque Ahmed, shares his reaction after taking the helm.#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh pic.twitter.com/1I1kL1nSZ6
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 21, 2024
बांगलादेशसाठी खेळले 7 एकदिवसीय सामने…
फारुख अहमद यांनी 1988 ते 1999 दरम्यान 7 एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एकदिवसीय सामन्याच्या 7 डावात फलंदाजी करताना त्यांनी 105 धावा केल्या, ज्यात 1 अर्धशतक आहे. याशिवाय त्यांनी 5 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्यांनी 8 डावात 36.85 च्या सरासरीने 258 धावा केल्या. या काळात त्यांनी 1 अर्धशतक झळकावले होते.
IND vs AUS : बुमराह सर्वच प्रकारातील अव्वल गोलंदाज..! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने उधळली स्तुतिसुमने
बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर…
दरम्यान, सध्या बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात आजपासून (21 ऑगस्ट) दोन सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यास सुरूवात झाली आहे. बांगलादेशसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असेल कारण आतापर्यंत बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. या दोघांमध्ये आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानने 12 सामने जिंकले, तर एक सामना अनिर्णित राहिला.





