ICC T20 Rankings मध्ये टीम इंडियाचा जलवा : पहिल्या ३ मध्ये २ भारतीय; अभिषेक अव्वल तर सूर्याची टॉप-१० मध्ये एन्ट्री
ICC T20 Rankings : आयसीसीने टी-२० क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला दिसत आहे.

ICC T20 Rankings Updates : आयसीसीने टी-२० क्रिकेटची ताजी क्रमवारी (Rankings) जाहीर केली असून भारतीय फलंदाजांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भारतीय संघाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने आपले नंबर वनचे स्थान अधिक भक्कम केले आहे. दुसरीकडे, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा टॉप-१० मध्ये जोरदार पुनरागमन करत इतर फलंदाजांना धोक्याचा इशारा दिला आहे.
अभिषेक शर्मा ९२९ रेटिंगसह अव्वल; विश्वविक्रमाच्या जवळ!
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तुफानी फलंदाजी करणाऱ्या अभिषेक शर्माने आपल्या रेटिंगमध्ये जबरदस्त सुधारणा केली आहे. पूर्वी ९०३ रेटिंग असलेला अभिषेक आता ९२९ रेटिंगसह पहिल्या स्थानावर कायम आहे. २०२५ मध्ये अभिषेकने ९३१ रेटिंग गाठले होते. आता तो या जुन्या विक्रमापासून केवळ दोन पाऊल लांब आहे. न्यूझीलंडविरुद्धचे उर्वरित दोन सामने अभिषेकसाठी नवा इतिहास लिहिण्याची संधी असतील.
सूर्यकुमार यादवची मोठी झेप; पाच स्थानांचा फायदा –
सूर्यकुमार यादव आयसीसी टी-२० क्रमवारीत टॉप १० मध्ये परतला आहे, तर अभिषेक पहिल्या स्थानावर कायम
काही काळ टॉप-१० मधून बाहेर असलेल्या सूर्यकुमार यादवने पुन्हा आपले ‘साम्राज्य’ मिळवण्यास सुरुवात केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन नाबाद अर्धशतके ठोकल्याचा फायदा सूर्याला रँकिंगमध्ये मिळाला. त्याने थेट ५ स्थानांची झेप घेत आता ७१७ रेटिंगसह ७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
Good news for India ahead of their #T20WorldCup defence as a host of their best white-ball players make strong gains on the latest rankings update 👀
Details 👇https://t.co/Wws0OzDf5W
— ICC (@ICC) January 28, 2026
पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकात मोठी तफावत –
अभिषेक शर्मा आणि दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज यांच्यात आता खूप मोठे अंतर निर्माण झाले आहे. इंग्लंडचा फिल साल्ट ८४९ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच दुखापतीमुळे बाहेर असूनही तिलक वर्मा ७८१ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
सूर्याच्या या पुनरागमनामुळे ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि टिम सायफर्ट यांना प्रत्येकी एका स्थानाचे नुकसान झाले आहे. सध्या टॉप-१० मध्ये भारताचे तीन फलंदाज (अभिषेक, तिलक, सूर्या) असून, आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने हे भारतीय क्रिकेटसाठी शुभसंकेत मानले जात आहेत.





