Bangladesh Team : १६०० मीटर धावताना बांगलादेशच्या संघाला फुटला घाम! आशिया कपपूर्वी फिटनेस टेस्ट ठरली फेल

Bangladesh Cricket Team Fitness Test : आशिया कप 2025 च्या तयारीसाठी रविवारी (10 ऑगस्ट) बांगलादेश क्रिकेट संघाच्या खेळाडूंची फिटनेस टेस्ट घेण्यात आली. मात्र, एक खेळाडू वगळता संपूर्ण संघ ही टेस्ट उत्तीर्ण होण्यात अपयशी ठरला. यामुळे 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणाऱ्या टी-20 फॉरमॅटमधील आशिया कपच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशच्या खेळाडूंना 1600 मीटर धावण्याच्या टेस्टमध्ये अडचणींचा सामना करावा लागला, ज्यामुळे प्रशिक्षकांची चिंता वाढली आहे. केवळ वेगवान गोलंदाज नाहिद राणा हा एकमेव खेळाडू या टेस्टमध्ये उत्तीर्ण ठरला.
1600 मीटर धावताना खेळाडूंना फुटला घाम –
क्रिकबझच्या अहवालानुसार, यापूर्वी बांगलादेश क्रिकेट संघाचा फिटनेस यो-यो किंवा बीप टेस्टद्वारे तपासला जात होता. मात्र, नवे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक नाथन कीली यांच्या मार्गदर्शनाखाली 22 खेळाडूंचा फिटनेस तपासण्यासाठी 1600 मीटर धावणे आणि 40 मीटर स्प्रिंट टेस्ट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या टेस्टमध्ये बहुतांश खेळाडूंना 1600 मीटर धावण्यासाठी 8 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला. याउलट, नाहिद राणाने ही टेस्ट 5 मिनिटे 31 सेकंदात पूर्ण करून सर्वांना प्रभावित केले.
प्रमुख खेळाडूंची निराशाजनक कामगिरी –
वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, तनवीर इस्लाम आणि शमिम पटवारी यांना 1600 मीटर धावण्यासाठी जवळपास 8 मिनिटे लागली. दुसरीकडे, अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन मिराजने ही शर्यत 6 मिनिटे 1 सेकंदात, तर निवृत्तीची घोषणा करणारा यष्टीरक्षक फलंदाज मुश्फिकुर रहीमने 6 मिनिटे 10 सेकंदात पूर्ण केली. तंजीम हसन साकिबने 5 मिनिटे 53 सेकंदात, तर शहादत हुसैन दीपूने 6 मिनिटांत आणि परवेझ हुसैन इमोनने 6 मिनिटे 13 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली.
हेही वाचा – Rohit Sharma : रोहितने खरेदी केली कोट्यवधींची नवी कोरी कार! नंबरप्लेटशी आहे खास कनेक्शन, पाहा VIDEO
नाहिद राणाचे झाले कौतुक –
संघ व्यवस्थापनातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, नाहिद राणाने आपल्या फिटनेसने सर्वांना प्रभावित केले. काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, परंतु संघातील प्रमुख खेळाडू या टेस्टमध्ये अपयशी ठरले. बांगलादेश सध्या नेदरलँड्सविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेची आणि त्यानंतर यूएईतील आशिया कपची तयारी करत आहे. यासाठी फिटनेस कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
लिटन दाससह काही खेळाडू कॅम्पला अनुपस्थित –
या फिटनेस कॅम्पमध्ये टी-20 संघाचा कर्णधार लिटन कुमार दास आणि तौहीद हृदय सहभागी झाले नाहीत. तसेच, नुरुल हसन सोहन, सैफ हसन, अफीफ हुसैन आणि महिदुल इस्लाम अंकोन हे खेळाडू सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बांगलादेश ‘अ’ संघासोबत गेले असल्याने त्यांनीही या कॅम्पमध्ये भाग घेतला नाही.





