Bangladesh : बांगलादेशच्या हवाई दलाचे विमान शालेवर कोसळून १९ ठार, तर ५० जण जखमी

Bangladesh – बांगलादेशच्या हवाई दलाचे प्रशिक्षणासाठीचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान १९ जण ठार झाले आहेत. प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे हे विमान राजधानी ढाक्यातील उत्तरा भागातल्या माईलस्टोन स्कूल ॲन्ड कॉलेजच्या इमारतीवर कोसळले, असे आरोग्य मंत्रालयाचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांचे विशेष सहाय्यक मोहम्मद सय्यदुर रहमान यांनी सांगितले. मृतांपैकी बहुतेक जण लहान मुले होती. या अपघातात अन्य डझनभर लोक जखमी झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
चिनी बनावटीचे एफ-७ बीजीआय या विमानाने दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उड्डाण केले होते आणि अल्पावधीतच ते कोसळले. किमान १९ जण ठार झाले असून ५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले असल्याचे अग्निशामक सेवा आणि नागरी सुरक्षा विभागाचे महासंचालक ब्रिगेडीअर जनरल झ्यायेद कमाल यांनी पत्रकारांना सांगितले. बचाव पथकाला घटनास्थळी १९ मृतदेह आढळून आले आहेत. घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य अजूनही सुरू आहे.
तत्पूर्वी या अपघातात १६ जण ठार झाले आणि किमान ७२ जण जखमी झाले असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांचे विशेष सहाय्यक मोहम्मद सय्यदुर रहमान म्हणाले होते. अपघातात जखमी झालेल्यांना कंबाईन्ड मिलिटरी हॉस्पिटल, ढाका मेडिकल हॉस्पिटल, नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ बर्न ॲन्ड प्लॅस्टिक सर्जरी या रुग्णालयामध्ये नेण्यात येत असल्याचे देखील रहमान यांनी सांगितले. जखमींपैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
विमानाचे वैमानिक फ्लाईट लेफ्टनंट मोहम्मद तौकिर इस्लाम यांच्यावरही कंबाईन्ड मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ज्या शाळेवर हे विमान कोसळले, त्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी शिकत होते. विमान कोसळल्याने या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि विमाननाने पेट घेतला. विमान पडल्यानंतर पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळी रवाना झाली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. हे विमान कोळण्यामागील कारण तपासले जाते आहे.
एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा
बांगलादेशमधील हंगामी सरकारने या विमान अपघातात मरण पावलेल्याप्रती सहवेदना म्हणून दिनांक २२ जुलै रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीमध्ये देशभरातील सरकारी इमारती आणि परदेशातील बांगलादेशच्या दूतावासांवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकणार आहे. देशाचे मुख्य सल्लागार डॉ. मुहम्मद युनूस यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.





