Baner Pashan Link Road: बाणेर-पाषाणकरांची १५ वर्षांची प्रतीक्षा संपली! रखडलेल्या लिंक रोडचा तिढा अखेर सुटला
Baner Pashan Link Road: पुणे महापालिकेकडून ६८ कोटींची भरपाई अदा; जिल्हा प्रशासनाने अंतिम निवाडा जाहीर केल्यानंतर महापालिकेने घेतला प्रत्यक्ष जागेचा ताबा.

Baner Pashan Link Road- बाणेर-पाषाण लिंक रोडच्या भूसंपादनाचा गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला तिढा अखेर सुटला आहे. या रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, जिल्हा प्रशासनाने अंतिम निवाडा (अवॉर्ड) जाहीर केला आहे. संबंधित जमीनमालकांना सुमारे ६८ कोटी रुपयांचा मोबदला अदा केल्यानंतर पुणे महापालिकेने प्रत्यक्ष जागेचा ताबा घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
त्यामुळे बाणेर, पाषाण, सुतारवाडी आणि परिसरातील दोन ते तीन लाख नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पुणे शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार (डीपी) मौजे पेठ पाषाण येथील सर्व्हे क्रमांक १३४ (पैकी) ते १३८ आणि १४० मधून ३६ मीटर रुंदीचा विकास आराखडा रस्ता प्रस्तावित आहे. बाणेर-पाषाण लिंक रोड म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता भूसंपादनाअभावी गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता.
या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महापालिकेने सुमारे ६८ कोटी रुपयांची भरपाई रक्कम अदा केली आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अंतिम निवाडा जाहीर करण्यात आला. महापालिकेच्या पथकानेही प्रत्यक्ष जागेवर जाऊन ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या भूसंपादनासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे,
भूसंपादन व व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त निखिल मोरे यांच्यासह संबंधित उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, मालमत्ता विभाग, बांधकाम विभाग आणि पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला. विशेष भूमिसंपादन अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनातील समन्वयामुळे भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जागेचा प्रत्यक्ष ताबा मिळाल्यानंतर पथ विभागाकडून रस्त्याचे उर्वरित काम तातडीने हाती घेण्यात येणार असून, हा रस्ता लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत खुला करण्याचे नियोजन आहे.





