मुंबई : माघी गणपती उत्सवानंतर सार्वजनिक मंडळाच्या पीओपी गणेश मूर्तींना तलावांमध्ये विसर्जित करण्यास मुंबई महानगरपालिकेच्या वतीने परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर आता आगामी काळात येणाऱ्या गणेश उत्सवासाठी देखील मुंबई महानगरपालिकेने पीओपी मूर्तींना पूर्णपणे बंदी असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा हवाला देखील मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेला पत्रकात देण्यात आला आहे. माघी गणेशोत्सवाप्रमाणे यावर्षी आगामी सार्वजनिक गणेशोत्सवावर देखील कोर्टाच्या नियमाचे सावट असणार आहे. येणाऱ्या गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सव पूर्णपणे पर्यावरण पूरक साजरा करावा, अशा आशयाचे परिपत्रक मुंबई महानगरपालिकेकडून जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात आगामी काळात होणाऱ्या गणेशोत्सवात पूर्णपणे पीओपीच्या मूर्तींना बंदी असेल. या संबंधात न्यायालयाच्या आदेशाचा देखील महानगरपालिकेने उल्लेख केला आहे. मंडळांच्या भूमिकेकडे लक्ष सार्वजनिक गणेशोत्सव दरम्यान पीओपी गणेश मूर्तींवरील बंदीचा मुद्दा दरवर्षी समोर येतो. मात्र अद्याप त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत न्यायालयाने देखील वारंवार निर्देश दिले आहेत. आता न्यायालयाच्या निर्देशाचा हवाला देत मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील काही महानगरपालिकांनी पीओपी मुर्तींवर बंदी घालणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता या संदर्भात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि राजकीय नेते काय भूमिका घेतात? हे पहावे लागेल. परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय? मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल PIL 96 of 2024 मधील दिनांक ३०.०१.२०२५ रोजीच्या अंतरीम आदेशानुसार, पीओपी मुर्तीना पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आले असून केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने दि. १२.०५.२०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका यांना दिलेले आहेत. सदर आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. मूर्तीकारांना पर्यावरणपूरक मुर्ती बनविण्यास प्रोत्साहन मिळावे याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुर्तीकारांना निःशुल्क मंडप परवानगी दिली जाईल. सार्वजनिक / खाजगी जागेवरील मंडपांकरीता अर्ज सादर करतेवेळी गतवर्षीची मंडप परवानगी सोबत जोडण्यात यावी. मूर्तीकारांना मंडप उभारण्यासाठी रस्ते आणि फूटपाथवर खड्डे खणण्यास प्रतिबंध असून खड्डे खणल्याचे आढळून आल्यास 2000 प्रती खड्डा याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. येथे केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडविल्या जातात असा फलक, मंडपाच्या प्रवेशव्दारावरील दर्शनी भागात्त सुस्पष्ट दिसेल अशा रितीने प्रदर्शित करावा. उत्सवावादरम्यान मूर्तीचे आगमन आणि विसर्जन सुकर होईल व स्थापनेदरम्यान मूर्तीचे स्थैर्य राहील एवढया उंचीची मूर्ती घडविण्यात यावी