मुंबई – प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. चित्रपटाचे निर्माते आणि लेखकांच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. आदिपुरुषच्या निर्मात्यांनी भगवान राम आणि रामायण यांची प्रतिमा खराब केल्याचा आणि करोडो हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.
याआधी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चित्रपटावर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली होती. सुरेश श्यामलाल यांच्या पत्रात असे लिहिले आहे की, “ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने आदिपुरुष चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्या प्रतिमेला मलिन करणारे आहेत. आदिपुरुष चित्रपट धार्मिक भावना दुखावत आहे.”
All India Cine Workers Association writes to Union Home Minister Amit Shah and Mumbai Police demanding registration of a case against producer, director and writer of movie Adipurush pic.twitter.com/9IId3SE0qx
— ANI (@ANI) June 24, 2023
पत्रात पुढे म्हटले आहे की, “प्रभू श्री राम हे भारतातील प्रत्येकासाठी देव आहेत. कोणी कोणत्याही धार्मिक श्रद्धेतून आलेला असला तरीही. चित्रपटात प्रभू राम आणि रावण अगदी व्हिडिओ गेमप्रमाणे दाखवण्यात आले आहे. यातील संवादामुळे प्रत्येकाच्या भावना देखील दुखावल्या आहेत. आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना विनंती करतो की या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे आणि भविष्यात चित्रपटगृहे तसेच ओटी प्लॅटफॉर्मवर आदिपुरुष चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी. अशी मागणी करण्यात आली आहे.