शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाच्या NCPच्या अध्यक्षपदी बाळासाहेब सातव

वाघोली – वाघोली तालुका हवेली येथील रामेश्वर प्रासादिक दिंडी चे अध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील (गवळी) यांची शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे शहरातील वेगवेगळ्या मतदारसंघाच्या अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत.
पुणे महानगरपालिकेत 23 गावांचा समावेश झाल्यानंतर हा भाग शहराचा उपनगरीय भाग म्हणून ओळखला जात असल्याने या मतदारसंघातील वाघोली येथील बाळासाहेब सातव पाटील यांची शिरूर हवेली मतदार संघाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याने वाघोली ला संधी मिळाली अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
वाघोली ग्रामपंचायतीत दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्य पद, पाच वर्ष तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद, एक वर्षाहून अधिक काळ रामेश्वर प्रासादिक दिंडीचे अध्यक्षपद बाळासाहेब सातव पाटील भूषवले आहे. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचे निकटवर्तीय व कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची पंचक्रोशीत ख्याती आहे.
बाळासाहेब सातव पाटील ( गवळी) यांची निवड झाल्याबद्दल शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार,पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे,वाघोली चे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष शिवदास उबाळे आदींनी अभिनंदन केले आहे.





