बाळासाहेब म्हणाले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल; राज ठाकरेंनी सांगितली ‘ती’ आठवण, १९९९ साली काय घडलं?

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी विजयी मेळाव्यातून मराठी भाषेला केंद्रस्थानी ठेवत आपल्या आक्रमक शैलीत सरकावर टीकेची तोफ डागली. तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे माय मराठीच्या मुद्यावर एकत्र आले होते. वरळीतील डोम सभागृहात विजयी मेळाव्याचे भव्य स्वरुपात आयोजन करण्यात आले होते.
पहिलीपासून महाराष्ट्र शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय लागू केला होता. या निर्णयाला ठाकरे बंधूंनी कडाडून विरोधा दर्शिवला. तसेच राज्यभरातूनही या निर्णयाला विरोध होत असल्याने वाढता विरोध लक्षात घेता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेबाबतचे दोन्ही जीआर रद्द केले. यानंतर दोन्ही भाऊ विजयी मोर्चाच्या निमित्ताने आज ५ जुलै या दिवशी एकत्र आले होते.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव ठाकरे अशी केल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या. यानंतर मराठी भाषेसंदर्भात आणि एकूणच मराठी भाषेविषयी राज ठाकरेंनी अनेक मुद्दे मांडले. यावेळी त्यांनी १९९९ सालचा किस्सा सांगितला. तो जाणून घेऊयात…
१९९९ मध्ये काय घडलं? राज ठाकरेंनी सांगितलं
१९९९ मध्ये शिवसेना भाजपचं सरकार येणार की नाही अशी स्थिती होती. पवारसाहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली होती, वेगवेगळे लढले होते. त्या वादात काहीच होईना, एके दिवशी मातोश्रीला बसलो असताना दुपारी दोन गाड्या आल्या. पुण्याचे प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आले. मी त्यांना सांगितलं बाळासाहेबांची झोपायची वेळ आहे. जावडेकर म्हणाले मुख्यमंत्री पदाचा विषय झालाय.
सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करायच ठरलंय. हे त्यांना सांगायचंय. मी म्हणालो काका उठ, मी एकेरीच हाक मारायचो, मी पुन्हा म्हणालो काका उठ, खाली जावडेकर आणि मंडळी आलेत. ते म्हणतायत मुख्यमंत्री पदाचा विषय झालाय. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय. बाळासाहेब म्हणाले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही. मला त्यावेळी समजलं की मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली. अशी आठवण राज ठाकरेंनी भाषणा दरम्यान बोलताना सांगितली.
हेही वाचा : मनसैनिक आक्रमक होताच केडियांनी मागितली माफी, म्हणाले, “जे काही बोललो ते चुकीच्या…”





