मनसैनिक आक्रमक होताच केडियांनी मागितली माफी, म्हणाले, “जे काही बोललो ते चुकीच्या…”

Sushil Kedia | शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि ‘केडियोनॉमिक्स’चे संस्थापक सुशील केडिया हे मराठी भाषेबद्दल केलेल्या एका टिप्पणीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले. सुशील केडिया यांनी केलेल्या पोस्टनंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर वरळीतील त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. यानंतर आता सुशील केडिया यांनी मराठी विषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे.
माझी चूक झाली आणि मी ती सुधारण्याचा प्रयत्न करेन
सुशील केडिया यांनी राज ठाकरेंकडे विनंती करत आपण वक्तव्य मागं घेतल्याचं म्हटले आहे. केडिया यांनी ४ मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी म्हंटले की, माझी चूक झाली आणि मी ती सुधारण्याचा प्रयत्न करेन. मराठी बोलण्याचा प्रयत्न करेन. मी जे काही बोललो ते चुकीच्या मानसिकतेतून आणि तणावातून बोललो होतो. माझ्या त्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून काहींनी वाद निर्माण केला, जे लोक मराठी बोलू शकत नाहीत त्यांच्यावर हल्ला होत असल्यानं मी घाई गडबडीने दिलेली ती प्रतिक्रिया होती. पण मला जाणवलं की माझी ती प्रतिक्रिया मागे घ्यायला पाहिजे, असंही सुशील केडिया म्हणाले. Sushil Kedia |
I request @RajThackeray Ji to consider my humble submission. pic.twitter.com/i8zGszgNtW
— Sushil Kedia (@sushilkedia) July 5, 2025
“राज ठाकरे यांच्याबद्दल मला नेहमीच खूप आदर आणि कृतज्ञता वाटत आली आहे कारण ते ठाम मुद्द्यांवर उभे राहतात, आपल्या सर्वांच्या चिंता असलेल्या मुद्द्यांवर ते ताकदीने उभे राहतात. ते नेहमीच एक नायक राहिले आहेत. पण यावेळी जेव्हा आपलेच लोक आपापसात भांडू लागले तेव्हा मी वेडा झालो. मी त्यांचा चाहता आहे, एक उत्कट फॉलोअर आहे आणि त्यांच्याबद्दल नियमितपणे सकारात्मक ट्विट करत असतो. परंतु अशा परिस्थितीत जिथे आपलेच लोक आपल्याच लोकांना दुखावत आहेत, त्यावेळी माझ्या भावनिक अतिरेकी प्रतिक्रिया मी व्यक्त केल्या. जेव्हा आपलेच लोक आपल्याला घाबरवतात तेव्हा सर्वत्र चुका होऊ लागतात. माझी चूक मी स्विकारतो. मी आशा करतो की जे हे वातावरण शांत करण्याचे आणि मराठी सहजतेने स्वीकारू शकण्याचे काम करु शकतील त्यांनी ते करावं. मी त्यांचा आभारी असेल,” असं केडिया म्हणाले. Sushil Kedia |





