Balasaheb Desai Sugar Factory: देसाई कारखान्याचा मोठा प्लॅन! ३ लाख टन गाळपाचं लक्ष्य; पण ‘या’ एका गोष्टीमुळे वाढली चिंता?
Balasaheb Desai Sugar Factory: कारखान्याच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पालकमंत्र्यांचे प्रतिपादन; शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस कारखान्याला देण्याचे केले आवाहन.

Balasaheb Desai Sugar Factory – लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सध्याचे सुमारे दोन लाख मेट्रिक टनांपर्यंतचे ऊस गाळप आगामी काळात तीन लाख मेट्रिक टनांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाण्याचे प्रमाण कमी करण्यासोबतच ऊस क्षेत्रवाढ आणि उत्पादन खर्चावर नियंत्रण या बाबींवर भर देण्यात येणार आहे.
सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, कारखान्याच्या हितासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. दौलतनगर येथे कारखान्याच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ना. देसाई बोलत होते. यावेळी कारखान्याची आर्थिक स्थिती, ऊस उपलब्धता, गाळपवाढ आणि सभासदांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा झाली.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे 35 टक्के ऊस अन्यत्र जात असल्याची बाब चिंतेची असल्याचे सांगत ना. देसाई यांनी कार्यक्षेत्रातील शेतकर्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याला दिल्यास गाळप वाढण्याबरोबरच कारखान्याची आर्थिक स्थिती अधिक सक्षम होईल. त्यामुळे शेतकर्यांनी कारखान्याला ऊस देण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कारखान्याने सभासदांच्या हितासाठी एफआरपीची पूर्तता करण्यासाठी कर्ज घेतले आहे. त्यामुळे भविष्यात उत्पादन खर्च कमी करून आर्थिक शिस्त राखणे आवश्यक आहे. ‘कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न’ ही स्वर्गीय आबासाहेब देसाई यांची शिकवण कारखान्याच्या कामकाजात अंगीकारण्याची गरज आहे. पाटण तालुक्यातील सिंचन योजनांना मिळणारी गती कारखान्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
तारळे विभागातील शेतीला 100 मीटर उंचीपर्यंत पाणी पोहोचविण्याच्या योजनेसह मोरणा-गुरेघर धरण प्रकल्पातील डावा व उजवा बंदिस्त कालवा आदी योजनांची कामे सुरू आहेत. यामुळे आगामी काळात ऊस क्षेत्र वाढण्यास मदत होईल. ऊस क्षेत्र वाढल्यास कारखान्याला अधिक ऊस उपलब्ध होऊन तीन लाख टन गाळपाचे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल.
त्यासाठी शेतकरी, सभासद आणि कारखाना प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचेही देसाई यांनी सांगितले. सभेला कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, रवीराज देसाई, आदित्यराज देसाई, शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख, अशोकराव पाटील, उपसभापती विजय पवार, बाळासाहेब पाटील,
अॅड. मिलिंद पाटील, अॅड. डी. पी. जाधव, अॅड. बाबुराव नांगरे, शशिकांत निकम, प्रशांत पाटील, सुनील पानस्कर, बशीर खोंदू, अभिजित पाटील, चंद्रकांत पाटील, सूरज चव्हाण, विजय जंबुरे, कार्यकारी संचालक प्रदीप यादव यांच्यासह पदाधिकारी, सभासद व हितचिंतक उपस्थित होते.





