छत्रपती संभाजीनगर – खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण तापले आहे. बजरंग दलाने ही कबर हटवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे मिलिंद एकबोटे यांनी ही कबर नष्ट करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता सरकारने औरंगजेबच्या कबरीवर सुरक्षा वाढवली आहे. त्या ठिकाणी आता एसआरपीएफची तुकडी तैनात केली आहे. त्यात 15 पोलीस कर्मचारी असणार आहे. तसेच दोन पोलीस अधिकारी कबरीचे संरक्षण करणार आहे. औरंगजेबाची कबर आमच्या गुलामगिरीची, लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून देते. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी. अन्यथा, बजरंग दल स्वभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल, असा इशारा बजरंग दलाने दिला आहे. औरंगजेब याची कबर हटवली नाही तर पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचे बजरंग दलाने म्हटले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, 27 वर्ष औरंगजेबाला येथे राहून राज्य करता आले नाही. त्याच प्रतीक म्हणून औरंगजेबाची कबर आहे. ही कबर आज काढून टाकली तर भविष्यात लोक गडबड करतील. त्यामुळे एक प्रतीक म्हणून त्या कबरीला हात न लावणे योग्य ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. हा इतिहास पुसण्याचा प्रकार काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे. विश्व हिंदू परीषद आणि बजरंग दल यांनी स्टंटबाजी करू नये. औरंगजेब जेवढा क्रूर होता तेवढ्याच क्रूरपणे महाराष्ट्रातील फडणवीस सरकार वागत आहे. घाशीराम कोतवालप्रमाणे गृहविभाग चालवला जात आहे. औरंगजेबाची कबर म्हणजे विरत्वाची कबर नाही तर ती कबर क्रूर पणाची आहे. त्यामुळे ती कबर शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देखील आहे.