Aurangzeb’s Tomb : औरंगजेबाच्या थडग्याचा मुद्दा आता थेट संयुक्त राष्ट्रात; त्याच्या वंशजाने केली ‘ही’ मागणी

नवी दिल्ली : छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या थडग्याचा मुद्दा आता थेट संयुक्त राष्ट्रात पोहोचला आहे. मोगल साम्राज्याचा शेवटचा बादशाह असलेल्या बहादूर शाह जफर यांचा वंशज असल्याचा दावा करत याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी या प्रकरणी थेट संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांना एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या थडग्याला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
औरंगजेबाच्या कबरीच्या म्हणजे वक्फ संपत्तीचा ट्रस्टी असल्याचे सांगत याकूब तुसी म्हणतात, ही कबर म्हणजे एक राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे स्मारक आहे. आणि याला पुरातत्त्व विभागाच्या 1958 च्या अधिनियमांतर्गत संरक्षित करण्यात आले आहे. याचाच उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे. पुरातत्त्व विभागाच्या नियमांनुसार, संरक्षित स्मारकाच्या आसपास कोणतेही अनधिकृत बांधकाम, आहे त्या परिस्थितीत काही बदल, संरक्षित स्मारकाचे उत्खनन किंवा त्याचा विनाश केला जाऊ शकत नाही. असे करायचा कोणीही प्रयत्न केल्यास ते बेकायदेशीर मानले जाईल आणि कायद्याच्या दृष्टीने ते दंडनीय असेल, असे तुसी यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, औरंगजेबाचे थडगं उखडण्याच्या मागणीवरून 17 मार्च रोजी नागपूरमधील एका रॅलीत दोन समाजांमध्ये हिंसाचार भडकला होता. यात काही समाजांनी हे थडगं हटवण्याची मागणी केली. त्यावरून दुसऱ्या धर्माच्या धार्मिक गोष्टींचे नुकसान झाल्याच्या अफवा पसरल्या आणि मग थेट पोलिसांवरच दगडफेक झाली. यानंतर आतापर्यंत जवळपास 92 जणांना अटक केली.





