नागपूर : औरंगजेबची कबर पाडण्याच्या मागणीवरून झालेल्या आंदोलनानंतर नागपूरमध्ये सोमवारी रात्री मोठा हिंसाचार घडला. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड फहीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे तर दुसरीकडे बजरंग दलाच्या जिल्हाध्यक्षांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये औरंगाबादचे कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. यात गणेशपेठ पोलीस ठाण्यात आंदोलन करताना औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. त्यामुळे आंदोलन करणे आणि काही लोकांच्या धार्मिक भावना दुखणे अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज गणेशपेठ पोलिसांनी कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष अमोल ठाकरे यांच्यासह सात लोकांना अटक करत जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी आता कोर्टात काय सुनावणी पार पडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बजरंग दलाचे कार्यकर्ते स्वतःहून आले शरण मोठ्या प्रमाणात लोकांचा आरोप होत होता की एकाच बाजूने कारवाई होतेय. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने अंतरिम जामीन मिळत असतानाही स्वतःहून गणेश पेठ पोलिसांना सहकार्य करत कोतवाली पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये येऊन सरेंडर केलं. यामध्ये जिल्हाध्यक्ष अमोल ठाकरे यांच्यासह अन्य सात जणांनी सरेंडर केलं.