Devendra fadnavis : ‘छावा’चा दाखला देत मुख्यमंत्र्यांचे औरंगजेबावर भाष्य; काय म्हणाले पाहा….

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत नागपूर दंगलीवर विस्तृत भाष्य केले. त्यात त्यांनी जनतेला एकमेकांप्रती आदरभाव बाळगून संयम राखण्याचे आवाहन केले. तसेच कुणी दंगल करण्याचा प्रयत्न केला तर त्याची जात, धर्म न पाहता कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला. विशेषतः पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सरकार सोडणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
फडणवीस म्हणाले की, 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वा. नागपुरातील महाल परिसरात विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे आंदोलन केले. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी हा गुन्हा दाखल झाला.
त्यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की, सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. यामुळे अत्तररोडमधील नमाज आटोपून 200 ते 250 चा जमाव त्या ठिकाणी जमला. हा जमाव नारेबाजी करू लागला. त्यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार द्यायची आहे, अशी मागणी केली.
एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागात 200- 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले. या घटनेत काही लोकांवर घातक शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेत 1 क्रेन, 2 जेसीबी व काही चारचाकी वाहने जाळण्यात आली.
3 डीसीपींसह 33 पोलिस जखमी
या संपूर्ण घटनेत 33 पोलिस जखमी झालेत. त्यात 3 उपायुक्त दर्जाचे पोलिस अधिकारी आहेत. त्यापैकी एका पोलिस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. एकूण 5 नागरीक जखमी झालेत. तिघांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.
2 रुग्णालयात आहेत. एक आयसीयूत आहेत. एकूण 3 गुन्हे गणेशपेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेत. तहसील पोलिस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे एकूण 5 गुन्हे आहेत, अशी माहितीही फडणवीसांनी दिली.
छावामुळे भावना प्रज्वलित
आज महाराष्ट्रात छावा या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेपुढे आणला. पण त्यानंतर राज्यात लोकांच्या भावना देखील एकप्रकारे प्रज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाविषयीचा राग मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असे वाटते की, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही फडणवीसांनी म्हटले.





