#Pune : खेड शिवापूर टोल नाका बनावट पावत्या प्रकरणात दोघांना जामीन

पुणे(प्रतिनिधी) – खेड शिवापूर टोल नाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहन चालक आणि शासनाची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.व्ही. निमसे यांनी 15 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे.
मनोज ऊर्फ दादा गजानन दळवी (वय 31, रा. पिराचा मळा, भोर) आणि सतिश सुरेश मरगजे (वय 41, रा. करवंडी, ता. भोर) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी ॲड. विवेक भरगुडे, ॲड. बाळासाहेब भोसले, ॲड. राकेश ओझा आणि ऍड. सागर गायकवाड यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
गुन्ह्यात एकुण चौदा जणांवर गुन्हा दाखल असून, पोलिसांनी 31 टोल पावत्या, 2 मॉनिटर, 2 प्रिंटर, 1 कीबोर्ड, रोख रक्कम असा 1 लाख 2 हजार 670 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटक केल्यानंतर दोघांना न्यायालयाने सुरूवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर जामिनासाठी अर्ज करण्यात आला. दोघे स्टाफ मॅनेजर म्हणून कार्यरत होते.
स्टाफ लोकांची ड्युटी ऍरेंज करण्याचे काम होते. वरिष्ठ सांगतील त्याप्रमाने वागत होतो. त्या कुणल्या पावत्या कोणी झापल्या, काय झाले, याबाबत दोघांनाही माहिती नसल्याचा युक्तीवाद ॲड. विवेक भरगुडे यांनी केला.





