पुणे जिल्हा | खडकीतील भुयारी मार्गाची दुरवस्था

मलठण, (वार्ताहर) – खेड तालुक्यातील खडकी व रावणगाव येथील राष्ट्रीय महामार्गाच्या गावठाण हद्दीतील भुयारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. वाहतुकीच्या पुलाखाली गुडघाभर खड्डे पडलेले आहेत. स्थानिक नागरिक, शाळेतील मुले, तसेच प्रवासी वाहनांची मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे तालुका युवक अध्यक्ष सचिन काळभोर यांनी इशारा दिला आहे.
खडकी ग्रामपंचायत आणि रावणगाव ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा करून देखील टोल प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दौंड तालुक्यातील पूर्व भागातील दोन्ही गावांच्या दळणवळणासाठी महत्त्वाचे असणारे हे पूल सध्या घाणीचे व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
या महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवारस्त्यावरून स्थानिकांची कायमच वर्दळ असते. या रस्त्याच्या उजव्या बाजूकडून डावीकडे जाण्यासाठी भुयारी मार्गाचा उपयोग केला जातो. या पुलाच्या खालून जात येत असताना गावातील बरेचसे नागरिक घसरून पडत आहेत. या दोन्ही गावांचा प्रश्न येणार्या आठ दिवसांत मार्गी न लागल्यास स्थानिक ग्रामस्थ तसेच पवार गटाचे कार्यकर्ते आंदोलन करण्याच्या पवित्रात असल्याचे काळभोर यांनी सांगितले.





