पुणे जिल्हा : कुरुळीतील रस्त्याची दुरवस्था

कुरुळी गावठाण मार्गे डोंगरेवस्ती दोन किमी मार्गाची स्थिती
चिंबळी – कुरुळी (ता. खेड) येथील कुरुळी गावठाण मार्गे डोंगरेवस्ती जाणार्या दोन किमीच्या रस्त्यावर सांडपाणी, अस्वच्छता यामुळे ग्रामस्थ नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे जिल्हा परिषद व कुरुळी ग्रामपंचायतीच्या निधीतून सुमारे पाच वर्षांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रीट करण्याचे काम पूर्ण झाले होते.
सद्यस्थितीत रस्त्याची चाळण झाली असून जलजीवन पाणीपुरवठा योजनेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोदाई करण्यात आली होती. दोन्ही बाजूची साइटपट्ट्या खचल्या असून रस्त्यावर माती पसरली आहे. जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला केलेल्या खोदाई तसेच रस्ता क्रॉसिंग खोदाई यामुळे ठीकठिकाणी या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूने कच्च्या मालाची मोठी मोठी गोदामे तसेच छोटे-मोठ्या कंपन्या देखील असून या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. या रस्त्यावरून माध्यमिक विद्यालय प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ नागरिक यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने रस्त्यावरून चालत जाणे कठीण झाले आहे. या रस्त्यावरती अनेक वेळा छोटे-मोठे अपघात तर काहींना अपंगत्व आले आहे. या रस्त्यावरती त्वरित कायमस्वरूपी उपाय योजना करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ कारीत आहे.
दोन किमीचा असणारा डोंगरी वस्ती कुरुळी गावठाण रस्त्यावरती विद्यमान उपसरपंच, दोन माजी सरपंच, माजी चार उपसरपंच सोसायटीचे पदाधिकारी यांची निवासस्थानी आहेत; परंतु रस्त्याच्या काम बाबत लोकप्रतिनिधी काम करत नसल्याबाबत गावच्या चावडीवर चर्चा रंगली होती.
या रस्त्याबाबत नागरिकांच्या वेळोवेळी तक्रारी आल्याने पावसाळ्यातील रस्त्यावरती मुरूम टाकण्यात आला होता. डोंगरी वस्ती-कुरुळी गावठाण रस्त्याबाबत वरिष्ठ कार्यालयात पत्र व्यवहार केला असेल कायमस्वरूपी नवीन रस्ता बनवण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे.
– कविता कोतवाल, ग्रामविकास अधिकारी, कुरुळी





