बाबा सिद्दीकींचा मुलगा झीशानही होता टार्गेटवर; एक फोन आला अन्…

Baba Siddiqui Case | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकीला देखील मारण्याची सुपारी देण्यात आल्याचा खुलासा आरोपीनं केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यासोबत झिशान सुद्धा बिश्नोई गँगच्या टार्गेटवर होता, असे वृत्त आता समोर येत आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी गोळीबार झाला त्यावेळी दोघेही एकत्र होते. दोघांनाही एकत्र मारण्याची संधी मिळाली नाही तर जो समोर दिसेल त्याला ठार मारा, अशी सुपारी मिळाल्याचं चौकशीत समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, हत्येची घटना घडली त्यावेळी बाबा सिद्दीकी यांच्यासोबत तीन कॉन्स्टेबल होते. पण ते काहीच करू शकले नाहीत. या गोळीबारात आणखी एक जण जखमी झाला आहे. आरोपींच्या चौकशीत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट हरियाणातील कतार तुरुंगात रचल्याची माहिती समोर आली आहे. तिन्ही आरोपी हरियाणाच्या कतार तुरुंगात एकत्र होते. तिघेही 2 सप्टेंबर रोजी मुंबईत आले होते.
दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने मोठी कारवाई करत आणखी एकाला अटक केली आहे. या प्रकरणातील संशयित सूत्रधार शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने पुण्यातून अटक केली आहे.
पुण्यात धर्मराज कश्यप आणि शिवानंद हे ज्या भंगाराच्या दुकानात काम करत होते त्या भंगाराच्या दुकानाच्या बाजूलाच प्रवीण लोणकर याच्या मालकीचे दुकान आहे. या हत्येसाठी प्रवीण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर यांनी मिळून शिवानंद आणि धर्मराज कश्यप यांना निवडल्याचा संशय पोलिसांना आहे.
फोन आला आणि झीशान वाचले
झीशान सिद्दीकी वडिलांसोबत घरी जात होते. दोघेही ऑफिसमधून निघाले होत. मात्र झीशानला फोन आल्याने ते परत ऑफिसला गेले. ते तेथे फोनवर बोलत असताना बाहेरून गोळीबार झाल्याचा आवाज आला. तेव्हा झीशान बाहेर आले तेव्हा बाबा सिद्दीकी गोळी लागल्याने जखमी अवस्थेत जमिनीवर पडले होते. जर झीशानला तो कॉल आला नसता तर हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला केला असता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हत्येच्या दिवशी काय घडले?
बाबा सिद्दिकींचे चिरंजीव आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या खेरवाडी सिग्नलजवळ असलेल्या कार्यालयाकडे जात असताना बाबा सिद्दिकींवर तीन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दिकी यांच्यावर एकूण 5 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या.
त्यातली एक गोळी त्यांच्या छातीजवळ लागली होती. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी त्याठिकाणी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. बाबा सिद्दिकी यांना 10-15 दिवसांपूर्वी धमकी मिळाली होती.





