Baba Adhav Andolan : “बाबा आढाव यांनी हे आंदोलन मागे घ्यावे…’ – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray । Baba Adhav : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र या निकालानंतर अनेकांकडून ईव्हीएम मशीनबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यापार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष उपोषणाची भूमिका घेतली.
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून २८ नोव्हेंबरपासून पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे डॉ. बाबा आढाव हे आत्मक्लेश उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाची दखल राजकीय नेतेमंडळींकडून देखील घेतली जात आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी देखील आंदोलनाची दखल घेतली आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आजचा दिवस लक्षात राहणारा आहे. बाबा आढाव प्रेरणा देणारे आणि प्रेरणा कधी म्हातारी होऊ शकत नाही. हरलेल्यांना आणि जिंकलेल्यांना देखील या निकालावर विश्वास नाही. वनवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते. हे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे.
योजनांच्या माध्यमातुन सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकत घेतला असून, या घोळात एक मोठा विषय इव्हीएम चा आहे. माझे मत कोठे जाते हे मतदारांना समजायला हवे. शेवटच्या एका तासात 76 लाख मते का वाढली. एवढं राक्षसी बहुमत असुन देखील महाराष्ट्रात आनंद का नाही.
बहुमत मिळून देखील राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पुजा – अर्चा करण्यासाठी का जातायत. अमावस्येला पुजा अर्चा करण्यासाठी गेलेत यावरुन यांची मानसिकता दिसुन येते महाराष्ट्र लेचा पेचा नाही. महाराष्ट्र देशाला दिशा देईल. महाविकास आघाडीतील शिवसेना , कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे आंदोलन पुढे नेतील. त्यामुळे बाबा आढाव यांनी हे आंदोलन मागे घ्यावे. असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.





