Ayush Komkar murder case | बंडू आंदेकरसह ११ जणांवर गुन्हा दाखल ; आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश

प्रभात वृत्तसेवा
पुणे – माजी नगरसेवक वनराज आंदेकर खुनातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर (१९, रा. नाना पेठ) याच्या खूनप्रकरणी आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल झाला आहे. टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकरसह ११ जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, त्यात दोन महिलांचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी यश पाटील, अमित पाटोळे यांना अटक केली आहे. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
बंडू आंदेकर, मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन पठाण उर्फ खान आणि यश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.आयुष कोमकर हा लहान भावाला क्लासवरून घेऊन घरी परत येताना नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला.
ही घटना घराजवळील पार्किंगमध्ये घडली. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात आयुष पडलेला होता. त्याला ससूनमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत आयुषची आई कल्याणी कोमकरच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला फिर्यादीत म्हॉले आहे की, वनराजच्या खुनानंतर आंदेकर टोळी सतत कुटुंबावर पाळत ठेवत होती. यामागे सूडाचीच भावना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये कल्याणी कोमकर यांनी अमन पठाण, यश पाटील यांना ओळखले असून ते बंडू आंदेकर टोळीशी संबंधित आहेत.१ सप्टेंबर २०२४ रोजी वनराज आंदेकर यांचा पिस्तुल व कोयत्याने खून केला होता. याप्रकरणी कोमकर कुटुंबीयांसह १६ जणांना अटक झाली होती. त्यानंतर दोन्ही टोळ्यांमधील वाद अधिक चिघळला.
“आयुष कोमकर खून प्रकरणी, दोन संशयितांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.”
– उमेश गित्ते, (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे)




