Ayush Komkar Murder | आयुष खून प्रकरणात गुजरात सीमेवर चौघांना अटक ; माजी नगरसेविकेचे गुन्हेगारी कनेक्शन?

प्रभात वृत्तसेवा
पुणे – आयुष कोमकर खून प्रकरणी फरार असलेल्या आंदेकर टोळीतील माजी नगरसेविकेसह चौघांना गुजरात सीमेवर अटक केली आहे. अटक केलेल्यांत शिवम उदयकांत आंदेकर ( ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर ( २१), शिवराज उदयकांत आंदेकर ( २९) आणि माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर ( ६०, सर्व रा. नाना पेठ) यांचा समावेश आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा फरार असून, त्याच्या मागावर गुन्हे शाखेची पथके आहेत. गुजरातमध्ये अटक केलेल्या चौघांची प्रवासी कोठडी मिळवली असून, त्यांना सोमवारी (१५ सप्टेंबर) पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
विसर्जन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला नाना पेठेतील टोळीयुद्धातून आयुष कोमकर याचा खून झाला होता. या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत बंडूअण्णा आंदेकर ( ७०,), त्यांचा नातू तुषार नीलंजय वाडेकर ( २७), स्वराज नीलंजय वाडेकर ( २३), विवाहित मुलगी वृंदावनी नीलंजय वाडेकर ( ४०), अमन युसुफ पठाण ( २५) यश सिद्धेश्वर पाटील ( १९), अमित प्रकाश पाटोळे ( १९, सर्व रा. नाना पेठ) सुजल राहुलू मेरगु ( २०, भवानी पेठ) यांना आधीच अटक झाली आहे.
५ सप्टेंबर रोजी सायंकाळी नाना पेठेतील हमाल तालमीजवळच्या सोसायटीत आयुष कोमकर लहान भावाला शिकवणीवरून घेऊन घरी आला. तळमजल्यावर दुचाकी लावत असताना आयुषवर पिस्तुलातून बेछूट गोळीबार करुन त्याचा खून करण्यात आला. याप्रकरणी आयुषची आई कल्याणी ( ३७) हिने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडू आंदेकरसह इतरांना बुलढाणा परिसरात अटक केली. आंदेकर टोळीतील पाच आरोपी पसार होते. गुन्हे शाखेचे पथके त्यांच्या मागावर होती. बंडू आंदेकरचा पुतण्या शिवम, शिवराज, अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकर हे गुजरातला पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर शनिवारी सायंकाळी अटक केली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीकर, शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.या प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ आराेपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई झाली आहे. बंडू आंदेकर, त्याची विवाहित मुलगी वृंदावनी, स्वराज, तुषार वाडेकर, तसेच अमन पठाण, यश पाटील यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून ७७ तोळे सोन्याचे दागिने, अडीच लाखांची रोकड, जमीन व्यवहारातील कागदपत्रे, मोटार, करारनामे जप्त केले आहेत.





