Ayush Komkar Murder | आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा! हत्यार पुरवणाऱ्या मुनाफ पठाणला अटक ; सोनाली आंदेकरही अटकेत

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुण्यातील नाना पेठेत गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष (गोविंद) कोमकरची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील फरार आरोपी तथा कृष्णा आंदेकरचा खास शूटर असलेल्या मुनाफ पठाणला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे.पोलीस तपासात असे उघड झाले आहे, की मुनाफ पठाणने आयुष कोमकरच्या हत्येसाठी वापरलेले हत्यार पुरवले होतं. त्यामुळे या गुन्ह्यात त्याचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल करून त्याला आरोपी करण्यात आले आहे. पठाण हा कृष्णा आंदेकरचा जवळचा सहकारी मानला जातो. वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचलेल्या कटामध्ये त्यानेही सहभाग घेतल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
सोनली आंदेकरला अटक..
पुण्यात टोळी युद्धातून झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता पुणे पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकरला अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी सध्या संपूर्ण आंदेकर कुटुंब पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. यापूर्वी कृष्णा आंदेकरने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते, तर बंडू आंदेकरलाही अटक करण्यात आली आहे. उदयकांत आंदेकरची पत्नी आणि तीन्ही मुलेही अटकेत आहेत. वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर ही पुणे पोलिसांच्या रडारवर होती. तिला आयुषची हत्या होणार असल्याची माहिती होती, असा आरोप आयुषच्या आईने केला होता.
बँक खाती, लॉकर सील..
पोलिसांनी कारवाई करत आंदेकर कुटुंबाची सगळी बँक खाती, लॅाकर सील केले आहेत. सगळ्या मालमत्तांची माहिती नोंदणी महानिरीक्षकांकडून घेऊन फॅारेन्सिक ॲाडिटर द्वारा तपास सुरू आहे, तसेच जप्तीची कारवाई होणार असल्याचीही माहिती आहे.





