BCCI : विराट-रोहित २०२७ च्या वनडे विश्वचषकापर्यंत खेळणार का? बीसीसीआयने केले स्पष्ट

BCCI not in hurry to take decision on Virat Rohit : बीसीसीआय सध्या दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माच्या वनडे क्रिकेटमधील भविष्याबाबत कोणताही घाईघाईत निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाही. बीसीसीआयचे पूर्ण लक्ष सध्या टी-20 स्वरूपात होणाऱ्या आशिया चषकावर आहे. येत्या ऑगस्टमध्ये नियोजित बांगलादेश दौरा रद्द झाल्याने भारताची पुढील तीन सामन्यांची वनडे मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 ते 25 होईल. कोहली आणि रोहित यांनी वनडेमध्ये एकत्रितपणे 83 शतके आणि 25,000 हून अधिक धावा केल्या आहेत.
2027 वनडे विश्वचषकापर्यंत खेळणार का?
भारतीय क्रिकेट विश्वात चर्चा आहे की, ऑक्टोबर 2027 मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकापर्यंत रोहित 40 आणि कोहली 39 वर्षांचे होतील. अशा परिस्थितीत हे दोन्ही दिग्गज खेळाडू तेव्हापर्यंत खेळत राहतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत माहिती असलेल्या एका सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, “जर त्यांच्या मनात काही योजना असेल, तर ते बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतील, जसे त्यांनी इंग्लंड कसोटी दौऱ्यापूर्वी केले होते.”
सध्या फक्त टी-20 विश्वचषकावर लक्ष –
सूत्राने पुढे सांगितले की, “भारतीय संघाच्या दृष्टिकोनातून पुढील मोठी स्पर्धा फेब्रुवारी 2026 मधील टी-20 विश्वचषक आहे. सध्या आशिया चषक टी-20 स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ पाठवण्यावर आणि सर्व खेळाडू तंदुरुस्त आणि उपलब्ध राहण्यावर भर आहे.” बीसीसीआय कधीच घाईघाईत निर्णय घेत नाही आणि कोहली-रोहित यांच्या मोठ्या चाहतावर्गाला पाहता, कोणताही संवेदनशील निर्णय घेण्यापूर्वी लोकांच्या भावनांचा विचार करते.
हेही वाचा – Rajat Patidar : छत्तीसगडच्या तरुणाला अचानक येऊ लागले विराट-डिव्हिलियर्सचे कॉल! काय आहे प्रकरण? जाणून घ्या
आयपीएलनंतर स्पर्धात्मक क्रिकेटपासून लांब –
या दोन्ही खेळाडूंनी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना दुबईतील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. यात कोहलीने पाकिस्तानविरुद्ध गट फेरीत शतक ठोकले, तर रोहितने अंतिम सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना शानदार अर्धशतक झळकावले होते. आयपीएलनंतर कोहली आणि रोहित यांनी स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. कोहली सध्या लंडनमध्ये राहत असून, त्याने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये तो इनडोअर नेट्समध्ये सराव करताना दिसला. यावरून त्याने सराव सुरू केल्याचे संकेत मिळतात.
हेही वाचा – Bangladesh Team : १६०० मीटर धावताना बांगलादेशच्या संघाला फुटला घाम! आशिया कपपूर्वी फिटनेस टेस्ट ठरली फेल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निरोपाच्या सामन्याची चर्चा?
दुसरीकडे, रोहित आयपीएलनंतर इंग्लंडमध्ये सुट्टीवर होता आणि नुकताच मुंबईत परतला आहे. लवकरच तोही सराव सुरू करेल, अशी अपेक्षा आहे.काही प्रसारमाध्यमांनी दावा केला होता की, बीसीसीआय कोहली आणि रोहित यांना 25 ऑक्टोबरला सिडनीत निरोप सामना खेळण्याचा प्रस्ताव देऊ शकते. मात्र, बीसीसीआयच्या एका सूत्राने या वृत्ताचे खंडन करत सांगितले की, याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. येत्या 24 डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफीचे आयोजन होत आहे. त्यापूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासह नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देशात तीन वनडे सामने खेळायचे आहेत.





