Test Cricket Record : ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! इंग्लंडचा धुव्वा उडवत कसोटीत रचला सर्वात मोठा विक्रम

Test Cricket Record in AUS vs ENG Ashes : प्रतिष्ठित ‘ॲशेस‘ (Ashes) कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व सिद्ध करत इंग्लंडचा ४-१ अशा फरकाने पराभव केला. सिडनी येथे झालेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवत कांगारूंनी मालिका खिशात घातली. विशेष म्हणजे, या मालिकेत दोन्ही संघांनी मिळून फलंदाजीचा असा काही वेग राखला की, कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महाविक्रमाची नोंद झाली आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं ‘असं’ –
यावेळच्या ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी मिळून ४ पेक्षा अधिकच्या धावगतीने (Run Rate) धावा कुटल्या. कसोटी क्रिकेटमध्ये ४ किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यांच्या मालिकेत आजवर कधीही दोन्ही संघांनी इतक्या वेगाने धावा केल्या नव्हत्या. यापूर्वी २०२३ च्या ॲशेस मालिकेत ३.९३ च्या सरासरीने धावा झाल्या होत्या, तो विक्रम आता मोडीत निघाला आहे. तसेच २०२५ च्या ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’मधील ३.८६ धावगतीचा विक्रमही मागे पडला आहे.
पाचव्या कसोटीचा थरार: जो रूट विरुद्ध ट्रॅव्हिस हेड
Almost all clean shaved=Almost clean swept England.#Ashes2025 #Ashes25 #AUSvsENG #ENGvAUS pic.twitter.com/ksgSOMfUQx
— Barkha Joshi (@bindasbarkha) January 8, 2026
सिडनी येथील पाचव्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात जो रूटच्या १६० (२४२ चेंडू) धावांच्या जोरावर ३८४ धावा केल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. ट्रॅव्हिस हेडने १६३ (१६६ चेंडू) आणि स्टीव्ह स्मिथने १३८ (२२० चेंडू) धावांची झंझावाती शतके झळकावत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ५६७ धावांपर्यंत पोहोचवले आणि १८३ धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या डावात बेथेलची झुंज ठरली अपुरी –
दुसऱ्या डावात इंग्लंडकडून युवा खेळाडू जेकब बेथेलने झुंजार फलंदाजी करत २६५ चेंडूत १५४ धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे इंग्लंडने ३४२ धावा करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ५ गडी राखून सहज पूर्ण केले आणि मालिकेवर ४-१ ने आपले नाव कोरले.





