Aundh Water Scarcity : औंधमध्ये पाणी टंचाईच्या झळा; पाणी असूनही गाव तहानलेले का? वाचा सविस्तर
Aundh Water Scarcity : औंधसह परिसरात तीव्र पाणीटंचाईचे संकट; नियमित १५ टँकर सुरू करण्याची आणि येळीव तलावात पाणी सोडण्याची गणेश देशमुख यांची मागणी.

Aundh Water Scarcity – औंधसह परिसरात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून प्रशासनाने त्वरित लक्ष घालून औंध गावामध्ये नियमित पाण्याचे पंधरा टँकर सुरू करावेत व येळीव तलावात जून अखेरपर्यंत उरमोडीचे पाणी उच्च दाबाने सोडावे अशी मागणी औंध येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश देशमुख यांनी केली आहे. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
औंध गावाला येळीव येथील तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपूर्वी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी शासनाकडे मागणी करून येळीव तलावात पाणी सोडण्यास सांगितले होते. मात्र येळीव तलावात उरमोडीचे सोडले जाणारे पाणी हे अतिशय कमी प्रमाणात येत असल्याने औंध गावातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
त्यातच मोठ्या प्रमाणात येळीव तलावातून पाण्याचा उपसा केला जात असल्याने व तलावात अनेक मोठ्या धेंडांच्या शेकडो मोटारी असल्याने हे पाणी बिनदिक्कतपणे शेतीसाठी वापरले जात आहे. ऐन पाणी टंचाईच्या काळात व तीव्र उन्हाळ्यात हे पाणी बेकायदेशीर पणे उपसले जात असल्याने औंधसह परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत प्रशासन कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करत नसल्याने औंध वासियांना तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. यंदा एकही उन्हाळी पाऊस न पडल्याने नागरिक, महिला हवालदिल झाले आहेत. याबाबत संबंधित लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून येळीव तलावात सोडल्या जाणार्या पाण्याचा कालावधी वाढवून किमान तीस जून पर्यंत करावा व येळीव तलावात उच्च दाबाने उरमोडीचे पाणी सोडावे तसेच येळीव तलावात असणार्या विद्युत मोटारींचे वीज कनेक्शन महावितरणने त्वरित तोडावे अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
सध्या येळीव तलावातील पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली आहे. औंधला पाणी पुरवठा करणारा जॅकवेल उघडा पडला आहे. याबाबत ठोस भूमिका न घेतल्यास पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. औंधची लोकसंख्या सुमारे सात ते आठ हजार आहे. त्यामुळे किमान तीन ते चार लाख लिटर पाण्याची नियमित गरज असते. याबाबत योग्य ती कारवाई करुन प्रशासनाने पाण्याचे टँकर सुरू करण्याबरोबरच येळीव तलावातही पाणी सोडावे अशी मागणी गणेश देशमुख यांनी केली आहे.






