Atul Benke : अतुल बेनके यांची दिल्लीत मोठी झेप! ५० कोटींच्या पुलाचा मार्ग मोकळा; पाहा कसा असेल प्लॅन
Atul Benke : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी आमदार अतुल बेनके यांच्या भेटीत हिवरे बु.-उंब्रज पुलाच्या ५० कोटींच्या निधीवर शिक्कामोर्तब.
Updated On:

Atul Benke – जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या हिवरे बु. ते उंब्रज पुलासाठी तब्बल ५० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्याची माहिती माजी आमदार अतुल बेनके यांनी दिली. दिल्ली येथे झालेल्या भेटीत या पुलासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी गडकरी यांनी स्व. वल्लभशेठ बेनके यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याची दखल घेतली.
त्यांच्या वारशाचा सन्मान म्हणून या पुलाच्या प्रस्तावाला विशेष प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पामध्ये पुलासह दोन्ही बाजूंचे रस्ते, संरक्षण भिंती, जमीन अधिग्रहण व त्याचा मोबदला तसेच वाढत्या खर्चाचा विचार करून एकूण ५० कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. पुलाच्या उभारणीमुळे हिवरे बु. ते उंब्रज या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित व जलद होणार असून, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.





