Nitin Gadkari : लोकांना मूर्ख बनविणारा नेता चांगला; नितिन गडकरींच्या विधानाने चर्चा

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आणि राजकीय पुढारी असूनही परखड भाष्य करण्यास ते कचरत नाहीत. आपल्याच खात्यातील अधिका-यांची कधी ते खरडपट्टी करतात तर कधी आपल्याच क्षेत्रातील पुढा-यांना बोल लावतात. आताही त्यांनी चांगला पुढारी कसा असतो, याबाबत एक विधान केले आहे.
त्यांनी म्हटले की, जो लोकांना सर्वाधिक मूर्ख बनवू शकतो, तो सर्वात चांगला नेता होऊ शकतो. नागपूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय महानुभाव पंथांच्या संमेलनात बोलत असताना त्यांनी राजकारण आणि इतर विषयांवर भाष्य केले.
संमेलनात उपस्थित असलेल्या संत-महंतांना उद्देशून बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, सरकारपासून दूर राहत जा. मग ते कोणत्याही पक्षाचे सरकार असो. तुम्ही वारंवार सरकारकडेच मागण्या करत असता. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी मंत्र्यांच्या गळ्यात हार घालून कामे करून घेत रहा. पण आपल्या पंथ आणि संप्रदायात मंत्र्यांना घुसू देऊ नका. त्यांना यापासून दूर ठेवा.
राजकारण, समाजकारण आणि विकासकारण वेगळे आहे. तुम्ही धर्मकारणात आहात. धर्मकारण आणि समाजकारण याला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. कारण आम्ही राजकीय लोक जिथे घुसतो, तिथे आग लावल्याशिवाय राहत नाही. मग महंत आपसात गादीसाठी भांडायला लागतात. मग मंत्री त्याला स्थगिती देतो आणि समिती नेमतो आणि दोन्ही महंत मग आमच्याकडे चकरा मारतात, असे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
धर्मकारण सत्तेपासून दूर हवे
धर्मकारण हे सत्तेपासून दूर असले पाहिजे. विक्रमादित्य सिंहासनावर बसण्याआधी धर्मगुरूने त्याच्या पाठीवर चाबूक मारले होते. राजा नाही धर्म श्रेष्ठ आहे. सत्य, अहिंसा, शांती, मानवता आणि समानता या स्वामीजींनी दिलेल्या शिकवणुकीवर समाजात बदल कसे होतील, हे पाहिले पाहिजे. बोलणे सोपे आहे, पण करणे कठीण आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.





