British naval base : ब्रिटनच्या नाविक तळावर घुसखोरीचा प्रयत्न; एक पुरुष आणि एका महिलेला अटक
ब्रिटनच्या नविक तळावर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एक पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

लंडन – ब्रिटनच्या नविक तळावर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एक पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे. स्कॉटलंड येथील अण्वस्त्रवाहक पाणबुडी तळावर हा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता, असे पोलिसांनी आज सांगितले.
एक पुरुष (वय ३४ वर्षे) आणि एका महिलेने (वय ३१ वर्षे) गुरुवारी संध्याकाळी सुमारे ५ वाजता एचएम नेव्हल बेस क्लाइडमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अटक झालेला पुरुष हा इराणी नागरिक असल्याचे ब्रिटनच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. घुसखोरीच्या प्रयत्नांनंतर दोघांना अटक झाल्याच्या वृत्ताला रॉयल नेव्हीने दुजोरा दिला आहे.
मात्र या प्रकरणाचा तपास सुरू असल्यामुळे याबाबत अधिक तपशील दिला जाणार नाही, असे सांगितले आहे. फासलेन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तळावर, अण्वस्त्रे वाहून नेणाऱ्या पाणबुड्यांसह, ब्रिटनच्या पाणबुड्यांचा ताफा आहे.
ब्रिटन १९५० च्या दशकापासून अण्वस्त्रधारक देश आहे. १९९० च्या दशकापासून, त्याच्या अणुशक्तीमध्ये ट्रायडंट क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या रॉयल नेव्हीच्या चार पाणबुड्यांचा समावेश आहे.





