Rahul Gandhi : ‘राहुल गांधींना रिलाँच करण्याचा प्रयत्न’; इंडिया आघाडीच्या मोर्चावर भाजपची टीका
काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून अराजकता निर्माण करून राहुल गांधींना पुन्हा राजकीयदृष्ट्या रिलाँच करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.

Rahul Gandhi – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढलेल्या मोर्चावर भाजपने मंगळवारी जोरदार टीका केली. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून अराजकता निर्माण करून राहुल गांधींना पुन्हा राजकीयदृष्ट्या रिलाँच करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.
भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेत संबित पात्रा यांनी राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाच्या विधानांचा चुकीचा अर्थ लावून देशात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म-६बाबत सर्वोच्च न्यायालयाने तो बेकायदेशीर असल्याचे म्हटलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीचा संदर्भ देत पात्रा म्हणाले की, न्यायालयाने केवळ नोटीस बजावली असून प्रकरणाची अद्याप सुनावणी झालेली नाही. याउलट, राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांनी फॉर्म-६ मध्ये बेकायदेशीरपणे आणि एकतर्फी बदल केल्याचा दावा केला होता.
काँग्रेस वारंवार राहुल गांधींना लाँच आणि री-लाँच करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पात्रा यांनी केला. त्यात अपयश आल्यानंतर देशात अराजकता निर्माण करून त्यांना नेतृत्वाच्या भूमिकेत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले. भाजपने काँग्रेसवर यापूर्वी लष्कर, सर्वोच्च न्यायालय, हिंदू, ईव्हीएम आणि आता निवडणूक आयोगावरही टीका केल्याचा आरोप केला.





