S. Jaishankar : “सध्याची व्यवस्था जागतिक वास्तवाशी विसंगत” – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
जयशंकर यांनी आरोप केला की, काही देश आफ्रिकेच्या हिताचा आधार घेत संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांना विरोध करत आहेत.

S. Jaishankar – संयुक्त राष्ट्रे (युएन) सध्या कोंडीत अडकली असून, युक्रेन आणि आखाती प्रदेशातील संघर्षांसह प्रमुख जागतिक प्रश्नांवर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत तिची भूमिका मोठ्या प्रमाणात अप्रस्तुत ठरली आहे, संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद सध्याच्या जागतिक वास्तवाचे पूर्ण प्रतिनिधित्व करत नसल्याने ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नमूद केले.
नवी दिल्ली येथे झालेल्या पाचव्या कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना जयशंकर यांनी यूएनमध्ये व्यापक सुधारणांची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की, युएन सध्या कोंडीत अडकली आहे. आखाती संघर्ष, युक्रेनमधील युद्ध, आफ्रिकेतील प्रश्न आणि कोविड-१९ महामारीदरम्यानही संस्थेची निर्णय प्रक्रियेतील भूमिका मर्यादित राहिली आहे.
आताच्या काळामध्ये जग अधिक बहुध्रुवीय आणि एकमेकांशी जोडले गेले झाले आहे. युएनची सदस्यसंख्या स्थापनेपासून जवळपास चौपट झाली आहे. मात्र, संस्थेची निर्णय घेण्याची रचना अजूनही जुनीच राहिली आहे. व्याप्ती चार पटीने वाढली असेल आणि व्यवस्थापन समिती मात्र तीच ठेवली, तर ते शक्य होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
जयशंकर यांनी आरोप केला की, काही देश आफ्रिकेच्या हिताचा आधार घेत संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांना विरोध करत आहेत. मात्र, आफ्रिकेने आंतर-सरकारी वाटाघाटींमध्ये सक्रिय सहभाग घेत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्यामुळे आफ्रिकेच्या नावाखाली युएन सुधारणांना विरोध करण्याचे प्रयत्न योग्य ठरत नसल्याचे त्यांनी सूचित केले.
जयशंकर यांनी सांगितले की, असे असले तरी देखील संयुक्त राष्ट्रांची गरज आजही कायम असून आंतरराष्ट्रीय समुदायासाठी या संस्थेने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यामुळे युएनला बाजूला सारणे हा उपाय नसून, बदलत्या जागतिक वास्तवाशी सुसंगत करण्यासाठी तिच्यात आवश्यक सुधारणा करणे गरजेचे आहे. या सुधारणांसाठी युएननेही सहकार्य करावे, असे त्यांनी नमूद केले.
जागतिक व्यापारात विसंगती वाढली
आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि व्यापार व्यवस्थेतील वाढत्या विसंगतींकडे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लक्ष वेधले. त्यांच्या मते, जागतिक बाजारपेठेची व्यवस्था मूलतः मुक्त बाजाराच्या तत्त्वांवर आधारित असली, तरी सध्या अनेक ‘बिगर-बाजार’ पद्धती आणि धोरणांचा प्रभाव वाढत आहे.
या पद्धतींमुळे निर्माण होणाऱ्या असमतोलावर अद्याप पुरेशा गांभीर्याने प्रश्न उपस्थित झालेले नाहीत, असे त्यांनी नमूद केले. बाजारपेठेचे नियम आणि प्रत्यक्षातील बिगर-बाजार वास्तव यांच्यातील वाढता संघर्ष हा सध्याच्या जागतिक आर्थिक व्यवस्थेतील प्रमुख समस्यांपैकी एक असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.
बदलत्या जागतिक परिस्थितीत व्यापार व्यवस्था अधिक पारदर्शक, समान आणि बाजाराच्या मूलभूत तत्त्वांशी सुसंगत असणे आवश्यक आहे. अन्यथा विविध देशांमधील आर्थिक स्पर्धा आणि व्यापार संबंधांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा त्यांचा इशारा होता.





