चाईबासा/रांची – झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलावर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. यावेळी नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे ३ जवान जखमी झाले आहेत. या जखमी जवानांना तातडीने उपचारासाठी रांचीला हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आले. हा हल्ला मनोहरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सारंडा जंगलातील बालिवामध्ये सीआरपीएफ १९७ बटालियनचे कर्मचारी शोध मोहिम राबवित असताना करण्यात आला. या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल व्ही. टी. राव, कॉन्स्टेबल जी. डी. धर्मेंद्रकुमार यांच्यासह अन्य एक जवान जखमी झाले. त्यांच्यावर घटनास्थळी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने रांचीला पाठविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.