Atomic clock : पुण्यात विकसित झाले ॲटॉमिक घड्याळ
क्यूप्रयोगची स्वदेशी अचूक वेळमापनाच्या दृष्टीने महत्त्वाची झेप

पुणे – पुणेस्थित क्यूप्रयोग कंपनीने अवघ्या सात महिन्यांत रुबिडिअम-८७ मूलद्रव्यावर आधारित प्रयोगशाळेत वापरण्याच्या आकाराचे ॲटॉमिक घड्याळ तयार करत स्वदेशी अचूक वेळमापनाच्या दृष्टीने महत्त्वाची झेप घेतली आहे.
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) सहकार्याने आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी केंद्रात विकसित होत असलेली ही स्टार्टअप कंपनी २०२४ मध्ये डॉ. जयंत मानगावकर, डॉ. राहुल सावंत यांनी स्थापन केली असून, ती क्वांटम उपकरण क्षेत्रात संशोधन करत आहे.
डिसेंबर २०२७ पर्यंत या घड्याळाची लघुप्रतिकृती तयार करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. या प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक निर्बंध आहेत. वैज्ञानिक, तसेच औद्योगिक क्षेत्रात या प्रकारच्या तंंत्रज्ञानाची मागणी वाढत आहे.
सध्या भारतात भारतीय अवकाश संशोधन संस्था या प्रकारची घड्याळे बनवत असली, तरी त्यांची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे या प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करून त्याचे उत्पादन करण्याची क्षमता निर्माण करणेही महत्त्वाचे आहे.
क्यूप्रयोगने तयार केलेले घड्याळ कोहरंट पॉपुलेशन ट्रॅपिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे घड्याळ इतके अचूक आहे, की १,५०० वर्षांत फक्त एक सेकंदाची चूक नोंदवली जाते, असा कंपनीचा दावा आहे. तुलनेत बाजारातील डिजिटल घड्याळात दिवसात १ ते २ सेकंदाची, तर साध्या यांत्रिकी घड्याळात दिवसात १ मिनिटापर्यंत चूक होऊ शकते.
स्वदेशी तंत्रज्ञानाचा आविष्कार
ॲटॉमिक घड्याळे उपग्रह आधारित दिशादर्शनासाठी (सॅटेलाइट नॅव्हिगेशन) महत्त्वाची आहेत. भारताने उपग्रह दिशादर्शनासाठी सोडलेल्या १२ उपग्रहांपैकी ६ उपग्रहांची ॲटॉमिक घड्याळे बंद पडल्याने त्यांच्या कार्यक्षमेतवर परिणाम झाला. ही ॲटॉमिक घड्याळे परदेशी बनावटीची होती. त्यामुळे नाविक सध्या फक्त ४ उपग्रहांवर काम करत आहे. त्यामुळे स्वदेशी तंत्रज्ञानाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.





