पिंपरी, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक आपण एकत्र लढलो, आता विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढायच्या आहेत, अशी घोषणा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यामुळे, महायुती ही केवळ विधानसभेपुरतीच असल्याचे स्पष्ट झाले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राजकीय पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने काळेवाडी, पिंपरी येथे रविवारी (दि.21) आयोजित केलेल्या निर्धार मेळव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लाांडे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक वसंत लोंढे, भाऊसाहेब भोईर, राजेंद्र जगताप, शाम लांडे, जगदीश शेट्टी, नाना काटे, राजू मिसाळ, प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, गंगा धेंडे, फजल शेख, अॅड. गोरक्ष लोखंडे, विजय लोखंडे आदी उपस्थित होते. आज पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण असे मेळावे घ्यायचे होते; पण ग्रामीण मेळावा होऊ शकला नाही, असे म्हणत अजित पवार यांनी पिंपरीच्या मेळाव्यातील भाषणाला सुरुवात केली. आज गुरुपौर्णिमा आहे, मी सर्व गुरूंना वंदन करतो.काही अफवा पसरवल्या जात आहेत. पुण्यात दीपक मानकर आणि पिंपरीमधील कार्यकर्ते सोबत आहेत. विकासासाठी आपण निर्णय घेतला, विरोधी पक्षात राहून आंदोलन करुन विकास होत नाही, प्रश्न सुटत नाही. काहीजण गेले,त्यांना स्वातंत्र्य आहे. आपल्याला पुणे पिंपरी चिंचवड शहरात जोमाने काम करावे लागणार आहे. वेळ फार कमी आहे. आपल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आणि आपण इथपर्यत पोहचलो, असे ते म्हणाले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपबाबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले, 2004 पासून मी पालकमंत्री म्हणून काम केले आहे. आरोप प्रत्यारोपला मी उत्तर देत नाही. मावळात पैसे गेले,मावळात पैसे गेले असे बोलले जात होते. आधी बारामती, शिरूरला निधी दिला, त्यावर कोणी बोलत नाहीत. सगळ्या आमदार खासदारांना मी बोलू दिले कारण नसताना नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे म्हणत डीपीडीसीच्या बैठकीतील खासदार सुप्रिया सुळेंच्या आरोपावर अजित पवारांनी पलटवार केला. तसेच, मीडिया पुढे काही तरी वेगळं मांडण्यात आल,वडीलधार्यांना बोलू दिले जात नाही अस सागितले. पण तसे काही नाही, सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला दिली आहे, असेही अजित पवार म्हणाले. सर्व जण गुण्यागोविंदाने राहिले पाहिजेत विशाळगडाबाबत ते म्हणाले, विशाळगड येथे जे घडू नये ते घडले,कोर्टाने आदेश दिले, त्यांना आता मदत केली. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, जाती-जातीमध्ये सलोखा राहिला पाहिजे, सर्व जण गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे, असेही पवार यांनी म्हटले.